शिक्षक पतसंस्था निवडणुकीसाठी 32 नामांकन दाखल
अहेरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था नोंदणी क्रमांक 186 ची निवडणूक दिनांक 16 मार्च 2025 ला होऊ घातली आहे. मोठी उलाढाल असलेली ही जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण पतसंस्था आहे. मागील निवडणुकीत शिक्षकांचे तीन पॅनल तयार झाले होते. या वेळेसच्या निवडणुकीत फक्त दोनच पॅनल तयार झाले आहेत. किशोर सुनतकर, अविनाश कविराजवार, वनिता कन्नाके, दिवाकर मादेशी, उमेश चिलवेलवार यांचे समता पॅनल आहे तर लक्ष्मण गद्यवार यांचे सोसायटी बचाव पॅनल आहे. एकूण 13 संचालक पतसंस्थेवर निवडून पाठवायचे आहेत तेरा पदासाठी तब्बल 32 जणांनी आपले अर्ज सादर केले आहेत. 5 मार्च 2024 ला नामांकन परत घेण्याचा अंतिम दिनांक आहे.
कोणत्याही पतसंस्थेच्या कार्यकारिणीची निवडणूक दर पाच वर्षांनी होत असते. याला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी अपवाद ठरली. मार्च 2017 ला या पतसंस्थेची निवडणूक झाली. 2020 मध्ये कोरोना आला. दोन वर्षे कोरोनात निघून गेले. सहकार विभागाने कोरोना कारणास्तव निवडणुकीतून लक्ष काढले. या पंतसंस्थेची निवडणूक पाच वर्षानंतर म्हणजे 2023 ला व्हायला पाहिजे होती. पण तसे झाले नाही. तब्बल तीन वर्षानंतर म्हणजेच 2025 ला आता निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. आणि निवडणूक होऊ घातली आहे. विद्यमान संचालक मंडळाला तीन वर्षाचा अतिरिक्त फायदा झाला आहे.
अहेरी येथे कार्यालय असलेल्या पतसंस्थेची निवडणूक स्थानिक प्राथमिक शिक्षकांसाठी प्रतिष्ठेची आहे. दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षक या निवडणुकीची वाट पाहत होते.जाहीरनामा प्रकाशित होताच शिक्षक सरसावले. विविध प्रवर्गासाठी राखीव असलेल्या एकूण 13 संचालक पदासाठी तब्बल 32 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. सर्वसाधारण गटाच्या एकूण आठ जागांसाठी 19 उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. इतर मागासवर्गाच्या एका जागे साठी तीन उमेदवारांनी अर्ज सादर केले. अनुसूचित जाती/जमातीच्या एका जागेसाठी दोन उमेदवारांनी अर्ज सादर केले. विमुक्त व भटक्या जमातीच्या प्रवर्गात तिघांनी अर्ज सादर केले. महिला राखीवच्या दोन जागेसाठी पाच महिला उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले आहेत
