भामरागड : पंचायत समिती भामरागड अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकामेटा येथील प्रकरण अजूनही चर्चेत असताना विद्यार्थिनीशी अशोभनीय वर्तन करण्याचे पुन्हा एक प्रकरण पंचायत समिती भामरागडमध्ये समोर आले आहे. या प्रकरणात भामरागड पोलिसांनी मुख्याध्यापक मालू नोगो विडपीला तात्काळ अटक केली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांच्यापुढे हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
जिल्हा परिषद समूह निवासी शाळा, भामरागड येथे मालू नोगो विडपी नामक मुख्याध्यापक आहे. या शाळेत 76 मुली /मुले निवासाने राहतात. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक या नात्याने मालू विडपी याची आहे. याचा गैरफायदा घेत मुख्याध्यापक विडपी याने मुलींच्या वस्तीगृहात राहणाऱ्या दोन मुलींशी अशोभनीय वर्तन केले. जुलै 2024 मध्ये एका मुलीशी अशोभनीय वर्तन केले. यावेळेस सदर मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.
दुसऱ्या मुलीशी अशोभनीय वर्तन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केले. कुठे वाचता केल्यास शाळेतून काढण्यात येईल असे धमकावले. असा आरोप त्याच्यावर आहे.
दिनांक 8 मार्च 2025 ला मुलींच्या वस्तीगृहात चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या विषयावर अधिक्षिकेकडून विद्यार्थिनींना समुपदेशन केल्या जात होते. संदर्भासाठी कुक्कामेटा शाळेचे उदाहरण अधीक्षिकेने यावेळेस दिले. कुणाला काही अडचण असल्यास न घाबरता पुढे यावे. सांगावे. असा विश्वास अधीक्षिकेने मुलींना दिला. अधीक्षिकेने मुलींना विश्वास दिल्यानंतर दोन मुली पुढे आल्या. आपल्याशी मुख्याध्यापक मालू विडपी याने अशोभनीय वर्तन केले असल्याचे सांगितले.
सांगितलेली बाब गंभीर स्वरूपाची असल्यामुळे अधीक्षिकेने पालकांना कळविले. पालक आले. घडलेला प्रकार ऐकताच ते सुद्धा घाबरले. त्यादिवशी पालक घरी परतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा परत आले. अधीक्षिका आणि पालक पोलीस स्टेशन भामरागड येथे गेले. या प्रकाराची रीतसर तक्रार पोलीस स्टेशन भामरागड येथे नोंदविण्यात आली.
तक्रार प्राप्त होतात पोलिसांनी मुख्याध्यापक मालू वीडपी याचेवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला. तात्काळ अटक केली.
अटक केल्यानंतर आज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अहेरी येथे त्यांना हजर करण्यात आले. येथून दृक-श्राव्य माध्यमाच्याद्वारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश गडचिरोली यांच्यापुढे मालू विडपी याला हजर केले. यावेळेस पोलिसांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. पोलिसांच्या वतीने सरकारी अधिविक्ता भांडेकर यांनी बाजू मांडली. आरोपी मालू विडपी याच्या वतीने एड. सतीश जैनवार यांनी बाजू मांडली. एड.जैनवार यांनी सात दिवसाच्या पोलीस कोठडीचा विरोध केला. न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून तीन दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.
या प्रकरणाचा पुढील तपास अमर मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या मार्गदर्शनात महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री सगने करीत आहेत.
