सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयाची अवस्था
अहेरी : जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीच्या निवडणूकीमुळे सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय, अहेरी तूर्तास चर्चेत आहे. पतसंस्थेच्या निवडणुकीमुळे या कार्यालयात शिक्षक उमेदवारांचा आणि समर्थकांचा रोजचा राबता आहे. दिनांक 5 मार्च 2025 ला निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले. प्रस्तुत प्रतिनिधीने यावेळेस या कार्यालयाला भेट दिली असता गल्लीबोळात असलेले हे कार्यालय कार्यालयासारखे वाटतच नव्हते. दुसऱ्या मजल्यावर असलेले हे कार्यालय चढायला शिक्षकांना चांगला जोर लागतो.
कोणते कार्यालय कुठे आहे ? ही माहिती जनतेला असने गरजेचे आहे. दर्शनी भागावर कार्यालयाच्या नावाचा फलक असणे आवश्यक आहे. भाडेतत्त्वावर असलेल्या कार्यालयाच्या दर्शनी भागावर कार्यालयाच्या नावाचा फलकच नाही. इमारतीच्या पहिल्या मजल्याचा जिना चढल्यावर दुसऱ्या मजल्याकडे वळसा घेताना 30-40 वर्षे जुना टिन-टप्पर, लोहा-लोखंड च्या सदरात मोडणाराएक जुना बोर्ड या ठिकाणी उभा करून ठेवण्यात आला आहे. बोर्डाच्या बाजूने असलेला कोपरा खर्राच्या पिचकारीने रंगलेला आहे. बोर्डावर सुद्धा खर्राच्या पिचकारीचा शिमगा दिसून येतो.
प्राप्त माहितीनुसार या कार्यालयामध्ये गेल्या एक वर्षापासून लोमेश रंधये नामक सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यरत आहेत. कार्यालयाच्या बोर्डाच्या अवस्थेवरून त्यांचे या कार्यालयाकडे फारसे लक्ष नसावे असे लक्षात आले.
