प्रतिनिधी
अहेरी : दि. 16 मार्च 2025 ला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची निवडणूक होऊ घातली आहे, या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. डमी मतपत्रिका,प्रसिद्धी पत्रके,जाहीरनामा इत्यादी साहित्यासह सोसायटी बचाव पॅनल आणि समता पॅनल पतसंस्थेचे मैदान गाजवणार आहे.या निवडणुकीच्या रणमैदानात एकमेकांविरोधात दंड थोपाटून उभे असलेले जिल्हा परिषदेचे हे शिक्षक वैयक्तिक आयुष्यात एकमेकांचे चांगले मित्र आहे. अनेकांचे कौटुंबिक संबंध सुद्धा आहेत. याचे भान ठेवून या शिक्षक उमेदवारांनी आज खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूक चिन्हांचा स्वीकार केला असल्याचे चित्र सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी येथे पाहायला मिळाले.
आज निवडणूक चिन्ह मिळण्याचा महत्त्वाचा दिवस. दोन्ही पॅनलला कोणते निवडणूक चिन्ह मिळेल या विषयी उत्कंठा होती. प्रतिष्ठेची झालेल्या निवडणुकीत उभे असलेले काही शिक्षक उमेदवार निवडणूक चिन्ह मिळण्याच्या वेळेस आवर्जून उपस्थित होते. उभे असलेले उमेदवार एकमेकांचे विरोधक असले तरी निवडणूक चिन्हांचा स्वीकार सामंजस्याने केला. चिन्ह मिळाल्यानंतर प्रत्येकाने एकमेकांना शुभेच्छा दिल्या हातात हात मिळवले.
एकंदरीत सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय अहेरी येथे खेळीमेळीचे वातावरण निर्माण झाले होते. गप्पाटप्पा रंगल्या होत्या. जुन्या आठवणींना उजाळा दिला जात होता. सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय येथे तयार झालेले चित्र मैत्रीपूर्ण वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे दिसले.
