प्रतिनिधी
अहेरी : जिल्हा मध्यवर्ती व सहकारी बँकेच्या विविध गावात शाखा आहेत. बँकेचा मोठा पसारा अहेरी उपविभागात आहे. बँकेत दोन-तीन वर्षांपूर्वी स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत होते. ‘कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक.’ स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतरत्र पाठविले. गडचिरोली, आरमोरी परिसरातील कर्मचारी व अधिकारी वर्गास येथे आणले. हेच कर्मचारी आता स्थानिक ग्राहक वर्गाला ‘डोकेदुखी’ ठरत आहेत.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अग्रणी बँक म्हणून ओळखली जाते. सहकारी बँकेच्या यादीत ही बँक अग्रक्रमावर आहे. गडचिरोलीच्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागात बँक सेवा देते. विविध प्रकारच्या योजना या बँकेच्या माध्यमातून राबविल्या जातात. यात कर्मचारी व अधिकारी वर्गाचा महत्त्वाचा मोठा वाटा आहे. म्हणून बँक फायद्यात आहे. राज्याच्या काही जिल्ह्यातील सहकारी बँक बुडाल्या. खातेदार हैराण आहेत. खातेदारांची रक्कम परत करणे अशक्य होत आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपला दर्जा टीकवून ठेवला आहे.
बँकेच्या यशात अधिकारी व कर्मचारी वर्गाची महत्त्वाची भूमिका आहे. दोन वर्षांपूर्वी स्थानिक कर्मचारी व अधिकारी येथे कार्यरत होते. अहेरी उपविभाग बहुभाषिक आहे. कर्मचारी व अधिकारी बहुभाषिक असल्याने ग्राहकांना सोयीचे होत होते. अधिकारी व कर्मचारी वर्ग ग्राहकांचा ओळखीचा होता. गावातील व्यक्ती असल्याने याच आपुलकीने अधिकारी व कर्मचारी वर्ग ग्राहकांना समजावून सांगत होता. अशिक्षित व अल्पशिक्षित ग्राहक वर्गाला स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मोठा आधार होता. दोन वर्षांपूर्वी काय झाले कुणास ठाऊक. बँकेच्या बदली धोरणामुळे स्थानिक अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या अन्य ठिकाणी बदल्या करण्यात आल्या. त्यांच्या जागी आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज व परिसरातील अधिकारी व कर्मचारी वर्ग येथे आणण्यात आला. यांना भाषेची मोठी समस्या इथे भेडसावत आहे. कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी आपुलकीने स्थानिक ग्राहकांशी संवाद साधत नसल्याचे चित्र बँकेत पाहायला मिळते आहे. यामुळेच या बँकेच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या काही ठिकाणी तक्रारी सुद्धा झाल्या आहेत. अन्य ठिकाणाहून आलेले अधिकारी व कर्मचारी वर्ग जाणून-बुजून ग्राहकांना त्रास देत असल्याचा प्रकार सुद्धा घडत आहे.
अहेरी, एटपल्ली, भामरागड, मूलचेरा सिरोंचा ही तालुके दुर्गम तालुके म्हणून ओळखल्या जातात. येथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा अल्प आहेत. खातेदार अल्पशिक्षित आहे. बरेच खातेदार अज्ञानी आहेत. सामाजिक भावनेतून खातेदारांना समजून सांगणारा अधिकारी व कर्मचारी वर्ग येथे गरजेचा आहे. म्हणून स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना येथे नियुक्त करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
