पोस्टमनची आधुनिक कपड्यांना पसंती
अहेरी : अंगावर खाकी कपडे, खांद्यावर झोळी, डोक्यावर खाकी टोपी अशा वेशातला पोस्टमन पूर्वी घरी यायचा तेव्हा प्रचंड आपुलकी वाटायची. काळ बदलला. पत्र येणे बंद झाली. पोस्ट विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. पोस्टमनचा ड्रेस बदलल्याचे किंवा बंद केल्याचे केंद्र शासनाने कोणतेच पत्र काढलेले नसताना गेल्या दहा वर्षापासून वेशभूषेतला पोस्टमन पाहायलाच मिळत नाही. पोस्टाचा महत्त्वाचा दुवा असलेला पोस्टमन स्वतःच बदलला.
डाक विभाग किंवा पोस्ट विभाग भारताच्या दूरसंचार मंत्रालयामार्फत नियंत्रित केल्या जाते. पोस्टाचे जगातील सर्वात मोठे जाळे भारतात आहे. या विभागातील महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून पोस्टमनची ओळख आहे. हिंदीत त्याला डाकिया म्हणतात. मराठीतला शब्द अजून ऐकिवात नाही. कार्यालयीन कामाचे पत्र, नोटीस इत्यादी घेऊन पोस्टमन घरी येतो. खाकी कपड्याची एलर्जी असल्यासारखी वृत्ती या पोस्टमनची झाली आहे. किंवा लाज वाटत असेल म्हणून आजचा पोस्टमन शंभर टक्के स्वतःच बदलला. खाकी कपडे घालून पोस्टमन पत्र वाटप करताना कधीच दिसत नाही. राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड आहे. ड्रेस कोड चे पालन केले नाही तर कारवाई होते. पोस्टात मात्र पोस्टमन बीनदिक्कतपणे ड्रेस कोडची अवहेलना करीत असताना अजून पर्यंत पोस्ट विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आली नाही.
सहा-सात वर्षांपूर्वी ग्रामीण भागात कंत्राटी पद्धतीने पोस्टमनची भरती करण्यात आली. दहावीतील टक्केवारीच्या आधारे ही भरती करण्यात आली आहे. यात मुला-मुलींचा समावेश आहे. ही मुले गावागावात जाऊन पत्रांचे वाटप करतात. आधुनिक कपडे घालून पत्र वाटप करत असल्यामुळे हे पोस्ट विभागाचे कर्मचारी आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही. यामुळे पोस्ट खात्याच्या कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य जनतेला होत नसताना दिसते. पोस्टाच्या कर्मचाऱ्याबाबत सामान्य जनता दुर्लक्षित रहावी हा उद्देश पोस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांचा दिसून येत आहे. कधीही आले, कधीही गेले. विद्यमान परिस्थितीत मुख्यालयी राहण्याचा प्रश्नच येत नाही. 50 किलोमीटर दूर पासून जाणे-येणे करतात. पोस्टमन चा वेश कायमस्वरूपी हद्दपार होणे आणि कर्मचारी अमावस्ये-पौर्णिमेसारखे दिसणे यामुळे पोस्ट विभागाची प्रतिमा सामान्य जनतेत मलीन होत आहे.

