अहेरी : देचलीपेठा-जीमलगट्टा हा 18 किलोमीटरचा रस्ता आहे. विविध तुकड्यांमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. तूर्तास सिंधा पासून पुढे देचलीपेट्याकडे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात जंगलातील माती मिश्रित गिट्टीचा वापर होत असल्याने या रस्त्याचा दर्जा कसा असेल ? हा प्रश्न स्थानिक परिसरातील नागरिकांना पडला आहे.
छत्तीसगडच्या सीमेला जोडणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. या रस्त्याने जीमलगट्टा-देचलीपेटा,बिराडघाट येथून छत्तीसगडकडे वाहतूक होत असते. सोबतच सिरोंचा तालुक्याच्या रमेशगुडम, कोपेला, पातागुडम अशी सुद्धा छत्तीसगडकडे वाहतूक जाते. या रस्त्याचे बांधकाम उच्च दर्जाचे आवश्यक असताना सुद्धा कंत्राटदाराने या रस्त्याच्या बांधकामात जंगलातील माती मिश्रित गिट्टीचा सर्रासपणे वापरणे सुरू केले आहे. सिंधा पासून पुढे या रस्त्याचे बांधकाम मजूर वर्गाकडून केले जात आहे. रस्त्याच्या कडेला जंगलातील माती मिश्रित आणली गेली. ही माती मिश्रित गोल, गुळगुळीत गिट्टी रस्त्यावर पसरवून त्यावर मुरूम टाकण्याचा प्रकार दिवसाढवळ्या सुरू आहे.
रस्ता दुर्गम व दुर्लक्षित क्षेत्रात मोडतो. तालुक्यापासून 70 ते 80 किलोमीटरच्या अंतरावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यालय व उपविभागीय कार्यालय आल्लापल्ली, अहेरी येथे आहे. या कार्यालयाच्या अभियंत्यांकडून या रस्त्याला नियमित भेट दिली जात नसल्याने कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर काम करून जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न करीत आहे.
18 किलोमीटरच्या या रस्त्यात वेगवेगळे तुकडे पाडून विविध कंत्राटदाराकडून काम केल्या जात असले तरी या कामाची कंत्राटदारांनी पूर्णपणे वाट लावली आहे. गेल्या वर्षी गडचिरोलीच्या एका कंत्राटदाराने 6 किलोमीटरच्या जवळपासचे काम केले होते. त्यावरचे डांबर पूर्णपणे निघून गेले आहे. खड्डे पडले आहे. देखभाल व दुरुस्तीच्या नावाचा पत्ता नाही. जंगलातील माती मिश्रित गीट्टीचा वापर केला जात असल्याने रस्त्याचा दर्जा पूर्णपणे निकृष्ट असणार आहे. 18 किलोमीटरच्या या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने भविष्यात हा रस्ता लवकरच खराब होऊन जनतेच्या वाट्याला त्रासच येणार आहे.

