लोकशाहीर वामनदादा कर्डक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील एक क्रांतिकारी युगकवी… एक वादळवारा.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सांस्कृतिक आघाडीची पताका निष्ठेने आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने बुध्द, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार प्रभावीपणे प्रसारित करण्याचे कार्य ते अविरत करीत राहिले.
येथील वर्णवादी, जातीवादी, विषमतावादी व्यवस्थेवर त्यांनी आपल्या लेखणीतून प्रहार केला. वामनदादा कर्डक यांची सामाजिक जाणीव ही तळागाळातील शोषित पीडित मानसाबद्दल तळमळ असणारी होती. त्यांनी लिहिलेल्या कविता विषमतावादी समाजव्यवस्थे विरुद्ध पेटून उठण्याची प्रेरणा देत असे समस्त शोषीतांना उर्जा देणारे असे त्यांचे क्रांतिकारी काव्य होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद हा वामनदादा कर्डक यांच्या गझलेचा प्राण होता. मानवी मुल्ये आणि सामाजिक समता प्रस्थापित करने हा त्यांच्या काव्याचा केंद्रबिंदू.
जिथे समानता आणि मानवी मूल्यांचा विचार आहे अश्या समाजाचा शोध वामनदादाचे गीत घेत राहते. त्यांच्या कविता परिवर्तनाचे स्वागत करणार्या आहेत. एकंदरच दादांच्या परिवर्तनवादी काव्याने बहुजनांच्या विचारांमध्ये नवचैतन्य संचारले आणि चळवळ गतिमान करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
माणूस हा वामनदादांच्या कवितेचा केंद्रबिंदू… माणसाच्या हितासाठी लिहावे आणि गावे हे त्यांच्या लेखकाचे ध्येय राहिले आहे.
म्हणून च एका कवितेतून वामनदादा म्हणतात,..
असे तुझे माझे नाते जुळावे
तुझ्या संकटाशी इथे मी लढावे
एकाने हसावे आणि एकाने रडावे
असे विश्व आता इथे ना उरावे
अंधारकोशात गुरफटलेल्या अवघ्या शोषीत, पिडीत दुंखीत जीवांना, मानवी समूहांना मुक्त करणारा विचार वामनदादांनी सोप्या भाषेत परंतु वजनदार शब्दात मांडून आपल्या काव्यातील प्रचंड ताकद दाखवून दिली.
क्रांतीसाठी सामाजिक सर्वहार वर्ग आणि आर्थिक सर्वहार वर्ग एकत्र आले पाहिजे, सारा कष्टकरी भारत एकजूट झाला पाहिजे, आदिवासी, भटके विमुक्त सारे शोषीत वर्ग आपल्या समान हितासाठी एकजूट झाले पाहिजे त्याशिवाय कुणाचीही मुक्ती नाही….. ही वर्गीय जाणीव देताना वामनदादा म्हणतात
उठून सारा देश उभा, आज तुझा तू करशील का
आज तरीही क्रांतीसाठी, वाट भिमाची धरशील का?
तो धनी तू चाकर का? तुलाच थोडी भाकर का?
सांग असा लाचारीनं, पोट तुझे तू भरशील का?
तुझा लढा तू लढताना.. सांग तू मागे सरशील का?
वामदादांनी आंबेडकरी मुक्तीलढ्याचे तेज अधिक प्रखर …तेजोमय करण्यासाठी स्वतःला, आपल्या लेखणी आणि वाणीला बुलंद आवाजासह झोकून दिले.
असा हा आयुष्याचा मशाल करून अंधार जाळणारा..
“सांगा आम्हाला बिर्ला, टाटा कुठाय हो? सांगा धनाचा साठा,आमचा वाटा कुठाय हो?अशा त्वेषपूर्ण शब्दात समाजाच्या विषम व्यवस्थेला सवाल करणारा शाहीर.. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनवादी चळवळीतील लोकसंस्कृतीचे चालते बोलते विघापीठ … वामनदादा कर्डक यांचा आज स्मृतीदिन त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.
– संतोष चिकाटे, आलापल्ली

