एकलव्य मारहाण प्रकरण
अहेरी : चप्पल आणि बांबूचा वापर करून विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या वस्तीगृह अधीक्षकावर काल रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन अहेरी येथे गुन्हा नोंदविण्यात आला. वस्तीगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे याला आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अहेरी यांच्यापुढे उपस्थित करण्यात आले. त्याचा जामीन मंजूर झाला.
एकलव्य निवासी शाळा अहेरीच्या विद्यार्थ्यांना करण्यात आलेल्या बेदम व अमानुष मारहाणीचे प्रकरण काल उघडकीस आले. दिनांक 15 मार्च 2025 ला पाढे म्हणून दाखवण्याच्या बहाण्याने वस्तीगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे याने विद्यार्थ्यांना बांबू व चपलने प्रचंड मारहाण केली. विद्यार्थ्यांच्या पायावर, मांडीवर काळे-निळे व्रण उमटले. विद्यार्थी या प्रकाराने प्रचंड धास्तावले होते. मारहाण झालेले विद्यार्थी खालच्या वर्गातील असल्याने भीतीग्रस्त झाले होते. याच ठिकाणी 12 वीचे विद्यार्थी शिकतात. त्यांना हा प्रकार सहन झाला नाही. 12 वीच्या विद्यार्थ्यांनी पायावर उमटलेल्या व्रणांचे फोटो मोबाईलच्या माध्यमाने काढले. समाज माध्यमांवर टाकले. अमानुष मारहाणीचे फोटो सार्वजनिक होताच प्रसार माध्यमांकडून दखल घेण्यात आली. ही बाब कळताच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अहेरी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, रतन दुर्गे, जावेद अली, सुरेश दुर्गे इत्यादींनी भेट देऊन प्राचार्यांना धारेवर धरले. विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
नागेश मडावी, रतन दुर्गे,सुरेश दुर्गे, जावेद अली यांनी तात्काळ प्रकल्प अधिकारी कार्यालय गाठले. प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांच्यासमोर ही घटना मांडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. मुलांना उपचारास्तव उपजिल्हा सामान्य रुग्णालय अहेरी येथे पाठवले. पोलीस स्टेशनला सूचना दिली. प्राप्त सूचनेनुसार व विद्यार्थ्यांनी दिलेल्या बयानानुसार हर्षद सत्यवान सडमेक रा. बंदूकपल्ली या विद्यार्थ्याच्या नावाने तक्रार नोंदवून घेण्यात आली. भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 118 (1) व अल्पवयीन न्याय कायदा 2015 ( मुलांची काळजी व संरक्षण ) 75 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. अन्य विद्यार्थ्यांचे बयान घेण्यात आले. रात्रीच वस्तीगृह अधीक्षक ईश्वर नारायण शेवाळे याला अटक करण्यात आली. आज दुपारी अहेरी पोलिसांनी ईश्वर नारायण शेवाळे रा. पद्मावती ता. भोकरदन जि. जालना हल्ली मुक्काम कर्मचारी वसाहत एकलव्य निवासी शाळा अहेरी याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.एम.एच. शाहिद यांच्यापुढे उपस्थित केले. आरोपी ईश्वर शेवाळेच्या वतीने एड.स्वाती जैनवार यांनी युक्तिवाद केला. पोलिसांच्या वतीने एड. राजकुमार उंदीरवाडे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजू ऐकून न्यायदंडाधिकारी एस.एम.एच. शाहिद यांनी ईश्वर शेवाळेला जामीन मंजूर केला.

