गावकऱ्यांची मागणी
पेरमिली : कोळसेपल्ली, एकरा, रापेल्ली, पल्ले आणि पेरमिली हा जवळपास 20 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्या दरम्यान कोळसेपल्ली येथून एक किलोमीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यामुळे एकरा येथील जनतेचा कोळसेपल्लीशी पावसाळ्यात संपर्क तुटतो. यामुळे या नाल्यावर पूल बांधावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
कोळसेपल्ली-एकरा हे तीन किलोमीटरचे अंतर आहे. कोळसेपल्ली येथून एकरा येथे जाताना अवघ्या एक किलोमीटर अंतरावर मोठा नाला वाहतो. या नाल्यावर रपटा किंवा पूल नसल्याने स्थानिक परिसरातील पल्ले, रापेल्ली, एकरा व कोळसेपल्ली या गावकऱ्यांचा एकमेकांशी सहा महिने संपर्क तुटतो नाल्यातील पाणी कमी झाल्यानंतरच या परिसरातील गावे एकमेकांच्या संपर्कात येतात. पल्ले, रापेल्ली, एकरा या गावातील जनतेस दामरांचा, कमलापूर, मांढरा येथे नियमितपणे यावे लागते यामुळे या नाल्यावर पुलाची आवश्यकता आहे.
नाल्याच्या दोन्ही बाजूने उंच भाग असल्याने येथे दुचाकी वाहन चालवणे सुद्धा जिकरीचे झाले आहे. सहजपणे येथून दुचाकी वाहन निघत नाही. मोठमोठी दगडे आहेत. वाहन कसेबसे काढावे लागते. जनतेस होणारा त्रास पाहू जाता या ठिकाणी पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

