प्रतिनिधी
भामरागड : पंचायत समिती भामरागड अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुक्कामेटा येथील मुख्याध्यापक रवींद्र उष्टुजी गव्हारे वय 46 याला लाहेरी पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनीशी गैरव्यवहार केल्याच्या कारणास्तव गव्हारे याला अटक झाली असल्याने शिक्षण विभागाप्रती जिल्ह्यात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे.
रवींद्र गव्हारे याच्यावर अनुसूचित जाती -जमाती कायदा, पोकसो व विविध कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून जिल्हा परिषद शाळेचा हा मुख्याध्यापक सध्या लाहेरी पोलिसांचा ‘पाहुणचार’ खात आहे.
गेल्या आठवड्याभरापासून रवींद्र गव्हारे हा शाळेतील विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन करीत होता. त्याचा हा प्रकार असह्य झाल्याने मुलींनी शाळेत जाणे सोडले. आपल्या मुली शाळेत का जात नाही या संदर्भात पालकांनी मुलींची चौकशी केली असता गव्हारे कडून घडत असलेला प्रकार पालकांना सांगितला. गव्हारेच्या या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. महिला पालकांनी तात्काळ पोलीस स्टेशन लाहेरी गाठले. माहिती दिली. प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने लाहेरी पोलिसांनी तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक सचिन सरकाटे यांनी या तक्रारीची तात्काळ दखल घेत मुख्याध्यापक रवींद्र गवारे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर विविध गुन्ह्याची नोंद केली.
गेल्या आठवड्यापासून गडचिरोली जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण गाजत आहेत. गडचिरोली येथून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवनी येथील एका बावीस वर्षीय शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलीवर अत्याचार करण्यात आला.
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. प्रकरण अजूनही तपासात आहे. या प्रकरणाची शाई वाळत नाही तोच शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राशी संबंधित असलेल्या मुख्याध्यापकाकडून असा प्रकार घडल्याने जनमानसामध्ये संतापाची लाट उसळली आहे.
दुसरीकडे चामोर्शी येथील लैला-मजनू शिक्षकांचे प्रकरण अजूनही ताजे आहे. लैला-मजनू शिक्षकांच्या चर्चेला अजूनही पूर्णविराम मिळालेला नाही. तोच हे प्रकरण पुढे आल्याने शिक्षण विभाग नकारात्मक चर्चेचा विषय झाला आहे.

