लैला-मजनू प्रकरण
प्रतिनिधी
चामोर्शी : येथून केवळ तीन किलोमीटरवर असलेल्या एका शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिकेचा गैरप्रकार शाळा व्यवस्थापन समितीने चव्हाट्यावर आणला. पंचायत समितीच्या चामोर्शी आणि जिल्हा परिषद गडचिरोली कडे लेखी तक्रार नोंदविली. शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा हा प्रकार आहे. संपूर्ण जिल्ह्यातून या प्रकाराचा निषेध होत असताना या दोन्ही लैला -मजनू शिक्षकांवर कोणतीच सक्षम कारवाई करण्यात आली नाही. दोघांना वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनियुक्ती देऊन भागविण्यात आले.
शाळा व्यवस्थापन समितीने पंचायत समितीच्या चामोर्शीच्या या कृतीचा निषेध केला असून या दोघांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
पंचायत समितीच्या चामोशी अंतर्गत जवळच असलेल्या एका शाळेतील हे लैला-मजनू शिक्षक आहेत. दोघेही विवाहित. वय पन्नाशीच्या घरात. मात्र यांचा शाळेतच ‘सैराट’ सुरू होता. कुणालाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत अशोभनीय प्रकार सुरू होता. विद्यार्थ्यांनी यांच्या ‘लीला’ डोकावून पाहिल्या तर त्यांना चोप देण्याचा प्रकार सुद्धा या लैला-मजनू कडून घडला. ही बाब बाल विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितली. सगळ्या प्रकार चव्याट्यावर आला.
प्रकार गंभीर स्वरूपाचा असल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांनी या बाबतीत लेखी तक्रार पंचायत समितीच्या चामोर्शी व जिल्हा परिषद गडचिरोलीकडे नोंदविली. चौकशी समिती गठीत झाली. चौकशी समितीने सुद्धा वेळ काढू धोरण अवलंबिले. वर्तमानपत्रांनी आणि विविध समाज माध्यमांनी दखल घेतल्यावर कारवाईचा ‘फार्स’ उभा केला. पण तो सुद्धा प्रतिनियुक्तीवर भागविला. अशा गंभीर प्रकारास प्रतिनियुक्तीवर भागविले जात असेल तर कोणत्याच शासकीय कर्मचाऱ्यावर वचक राहणार नाही आणि तो ‘सैराट’ होईल अशी प्रतिक्रिया सर्व सामान्य माणसांमधून व्यक्त होत आहे.
