राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी च्या बांधकामातील प्रकार
गुड्डीगुडम : आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 चे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून सुरू आहे. रस्ता बांधकामात सातत्य नाही. जनतेला होणाऱ्या त्रासाशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला काहीही घेणे-देणे नसल्याने ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशी अवस्था राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करून ठेवलेली आहे. गोलाकर्जी-छल्लेवाडा बस थांब्या दरम्यान महामार्गाच्या बांधकामाचे काम प्रगतीपथावर होते. मागील पंधरा दिवसापासून हे काम बंद करण्यात आले. नंदिगाव-निमलगुडम असे काम सुरू करण्यात आले आहे.
महामार्गाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदाराकडे आवश्यक वाहनाचा अभाव दिसत असल्याने एक सुरू तर दुसरे बंद अशी अवस्था कंत्राटदाराने करून ठेवली असल्याने येत्या पावसाळ्यात या महामार्गावरून जाणे-येणे करणाऱ्या जनतेला यावर्षी मोठ्या त्रासाचा सामना करावा लागणार आहे. 15 जून 2025 च्या दरम्यान स्थानिक परिसरात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अर्थात यावर्षीचा पावसाळा लवकरच सुरू होईल असा अंदाज असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व कंत्राटदार मात्र कामाची गती वाढविण्यास तयार नसल्याने जनता वैतागली आहे.
आल्लापल्ली-सिरोंचा या १०० किलोमीटरच्या रस्त्याचे काम आल्लापल्ली पासून रेपनपल्लीपर्यंत अनेक ठिकाणी रखडल्याचे दिसते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्यात कोणतेही तारतम्य नाही. कामात वापरण्यात येणारी वाहने संख्येने कमी असल्याने ‘दिन मे ढाई कोस’ या पद्धतीने काम सुरू आहे. गोलाकरजी ते छल्लेवाडा या 15 किलोमीटरचे काम मागील महिन्यात वेगाने सुरू होते.एका बाजूचा रस्ता डांबर टाकून तयार करण्यात आला. यानंतर दुसरी बाजू हाती घेतली पण ती बाजू पूर्ण करण्यात आली नाही. रस्त्यावर गिट्टी पसरलेली आहे. पंधरा दिवसापासून काम बंद आहे. सुरू असलेल्या कामाला कंत्राटदाराने ग्रहण लावले. हे काम बंद केले तर दुसरीकडे नंदीगाव आणि निमलगुडम दरम्यान कामाला सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वी नंदीगाव-गुड्डीगुडम दरम्यान गिट्टी पसरवून ठेवली होती. तेथे काम करण्याचे नावाच घेतल्या जात नव्हते. या ठिकाणी अनेकांचे अपघात सुद्धा घडून आले. प्रचंड धूळ लोकांच्या नाकातोंडात जात होती. सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी नंदिगाव-निमलगुडम रस्त्याचा प्रश्न उचलला. चक्काजामचा इशारा दिला. दखल घेण्यात आली. काम सुरू करण्यात आले. दुसरीकडे गोलाकरजी-छल्लेवाडा दरम्यान सुरू असलेले काम थांबविण्यात आले. ‘इकडे आड-तिकडे विहीर’ अशी अवस्था करून ठेवली.
गोलाकरजी-छल्लेवाडा या 15 किलोमीटरच्या रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले. तर दुसरीकडे गोलाकरजी-निमलगुडम या सात किलोमीटरच्या कामाला अजूनही हात लावण्यात आला नाही. यावर्षी हे काम सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. रस्त्यात लहान पुलांचे बांधकाम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी कसेबसे पुल पूर्ण करण्यावर कंत्राटदाराचा भर दिसत आहे. रस्ता मात्र पुढच्या वर्षी वर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मौसम-आलापल्ली दरम्यान गिट्टी पसरून ठेवण्याचा प्रताप कंत्राटदाराने केला आहे. येथे गीट्टी पसरवून ठेवण्यात आली असली तरी पुढच्या कामाला सुरुवात केली नसल्याने हे काम येत्या पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्यता दिसत नाही. कोणी कितीही आंदोलन करा आम्हाला फरक पडत नाही. आम्ही आमच्या मर्जीनेच काम करू अशी भूमिका कंत्राटदारांनी घेतल्याचे दिसते. दलालीच्या अनुषंगाने बांधकाम विभागाचे कंत्राटदाराशी सौख्याचे संबंध असल्याने हा विभाग सुद्धा कंत्राटदारांना फारसा आग्रह करत नाही. याचा फटका मात्र जनतेला बसत आहे.
