एटापल्ली : कोपा कांडे उसेंडी. मुक्काम परसलगोंदी. पोस्ट उडेरा. तालुका एटापल्ली. जिल्हा गडचिरोली. सध्या मय्यत. बंदुकीच्या आकर्षणातून जवळपास 30 वर्षांपूर्वी कोपा कांडे उसेंडी नक्षलवादी झाला. दलम मध्ये गेल्यानंतर कोपाचा ‘मनोज’ झाला. जवळपास एक वर्षा पूर्वी कोपा कांडे उसेंडी उर्फ मनोज यांचा वृद्धापकाळमुळे मृत्यू झाला. मृत्यूनंतर नक्षलवाद्यांनी कोपा उर्फ मनोज चा मृतदेह जंगलात सोडून दिला. घरच्यांना याविषयीची कल्पना दिली. कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेऊन मृतदेह पर्सलगोंदी येथे आणला. अंत्यसंस्कार केले.
तीस वर्षांपूर्वी दलम मध्ये जाऊन नक्षलवादी झालेल्या कोपाचा मोठा मुलगा मिरगू कोपा उसेंडी आज गावातच शिक्षक झाला आहे. पेसा अंतर्गत करण्यात आलेल्या नियुक्तीमध्ये त्याची निवड झाली. गेल्या सहा महिन्यापासून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पर्सलगोंदी येथे तो विद्यादानाचे कार्य करीत आहे.
वडिलाने नक्षल चळवळ जवळ केली. मिरगू उच्च शिक्षण घेऊन लोकशाहीचे रक्षक तयार करीत आहे.
30 ते 40 वर्षांपूर्वी पर्सलगोंदी दुर्गम परिसर म्हणून ओळखल्या जात होता. वाहतुकीला धड रस्ते नव्हते. वाहतुकींच्या साधनांचा अभाव होता. घनदाट किर्र जंगल यामुळे नक्षलवाद्यांचा मोठ्या प्रमाणात वावर होता. कोपा कांडे उसेंडी नक्षल चळवळीकडे आकर्षित झाले. पत्नी, मुलाबाळांना सोडून त्यांनी नक्षल चळवळ स्वीकारली. यानंतर संपूर्ण जीवन त्यांनी नक्षल चळवळीत काढले. वृद्धापकाळमुळे अनेक आजारांनी ग्रासले. यातच त्यांचा छत्तीसगड राज्यात मृत्यू झाला.
वडील नक्षल चळवळीत असले तरी बालपणापासूनच मिरगुचे शाळेकडे आकर्षण होते. पहिली ते सातवी गावातल्याच शाळेत तो शिकला. आठवी ते बारावीचे शिक्षण भगवंतराव माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे घेतले. पदवीच्या शिक्षणासाठी त्याने नागपूर जवळ केले. शंकरराव बेजलवार कला महाविद्यालय अहेरी येथून मराठी वाङ्मयात पदव्युत्तर पदवी घेतली. कामठी जिल्हा नागपूर येथून त्याने शिक्षणशास्त्र पदवी घेतली. पुढे तो नागपूर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. पेसा अंतर्गत निघालेल्या जाहिराती अन्वये एम. ए., बी. एड. झालेल्या मिरगुने अर्ज सादर केला.आणि मिरगुची गावातल्याच शाळेत शिक्षक म्हणून निवड झाली आहे. गेल्या सहा महिन्यापासून तो आपल्याच गावात विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करीत आहे. ज्या शाळेत शिकला त्याच शाळेतील विद्यार्थ्यांना तो शिकवत आहे. घरी अगदी बेताची शेती, कौटुंबिक पार्श्वभूमी गरिबीची,वडीलानंतर आईने भाऊ-बहिणींचा सांभाळ केला. या सगळ्या गोष्टीचे मिरगू आज ‘सोने’ करीत आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीने मिरगूची भेट घेतली असता प्राथमिक शिक्षण घेतलेल्या शाळेतच शिकवण्याची संधी मिळाली याचा आनंद असल्याची त्याने सांगितले. स्पर्धा परीक्षा देण्याकडे आपला कल आहे असे तो म्हणाला.
मिरगू कोपा उसेंडी हा दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ‘आयकॉन’ ठरत आहे. कठीण परिस्थितीत असलेला, दुर्गम भागातील विद्यार्थी सुद्धा शिक्षणाच्या बळावर आपलं आयुष्य उज्वल करू शकतो. परिस्थितीला दोष न देता संघर्ष करावा असे मिरगू म्हणतो.

