तालुका आणि विविध उपविभागाचे गाव म्हणून अहेरी सर्वदूर परिचित आहे. अहेरी पुरातन आहे. जुनी वस्ती म्हणून ओळख असलेल्या अहेरीला केवळ एकच मुख्य रस्ता वाट्याला आला. बसस्थानक अहेरी पासून आलापल्लीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. दिवसाची 90 टक्के वाहतूक या रस्त्यावर असते. हा रस्ता उत्तम असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून या रस्त्याच्या वाट्याला ‘साडेसाती’ आली आहे. कशी जाईल, कधी जाईल माहित नाही. ‘तूर्तास साडेसाती’ कायम आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या बांधकामाच्या निविदा काढल्या. कंत्राटदारांची स्पर्धा झाली. चंद्रपूर येथील गुप्ता नामक कंत्राटदाराला काम मिळाले. गुप्ता भलताच वेळकाढू दिसत आहे. कारण काय माहित नाही. गुप्ता कंगाल झाला. अशी चर्चा आहे. गुप्ताने 60 हायवा ट्रक विकत घेतले. या ट्रकांना काम नाही. केलेली गुंतवणूक बिनकामाची ठरली. गुप्ता कडे पैसा नाही. म्हणून गुप्ता कामाकडे दुर्लक्ष करीत आहे अशी बतावणी गुप्ताचे समर्थक करीत आहे. याला काही अर्थ नाही. काम घेतले करून द्यायचेच आहे. व्याजाने पैसे घे, नाहीतर स्वतः ‘गहाण’ रहा. भीक माग. किंवा सरळ सरळ हात वरती करून मी हे काम करू शकत नाही. माझे काम रद्द करण्यात यावे असा लेखी अर्ज देऊन कामातून वेगळे होणे उचित ठरेल. ही भूमिका गुप्ताने घेतली असती तर आज अहेरीकरांचे हाल झाले नसते. पण गुप्ता पक्का व्यवसायिक आहे. कंत्राटदारीच्या माध्यमातून मिळणारा मलिंदा त्याला लाटायचा आहे. कामही दिन मे ‘ढाईकोस’ करायचे आहे. मस्तावल्याचा प्रकार आहे. गेल्या वर्षभरात सुरू असलेल्या कामाकडे पाहिले तर गुप्ताने अहेरीकरांना मानसिक त्रासच दिला आहे. प्राणहिता ते बस स्थानक या रस्त्याचे व्यवस्थित व नियमित काम केले तर एक महिना पुरेसा आहे. स्थानिक कंत्राटदारांनी एका महिन्यात कामे आटोपली आहे. पण गुप्ताने एका महिन्याला एक वर्ष लावून अहेरीकरांच्या समस्येत भर घातली. याचा उपाय कुणालाही सापडत नाही हे एक दुसरे दुर्दैव म्हणावे लागेल. यात सार्वजनिक बांधकाम विभागाची भूमिका संशयास्पद आहे. गुप्ता सार्वजनिक बांधकाम विभागाला नाचवित आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुख्य रस्ता असल्याने या रस्त्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लहान-मोठे अधिकारी ये-जा करतात. यामुळे त्यांच्याकडून समस्येची तात्काळ दखल घेणे गरजेचे होते. पण गुप्ताला समज देण्यात हा विभाग अपयशी ठरला. कारण काय त्यांनाच माहीत. सामान्य जनतेच्या मते सार्वजनिक बांधकाम विभागात असलेले हे 2 टक्क्याचे राजकारण आहे. भ्रष्टाचार शिष्टाचार झाला आहे. शासन प्रशासनात जास्तीत जास्त कमावण्याची स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेत कामाचा दर्जा ढासळला आहे. प्रशासनात लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकांचे हात बरबटले आहेत. नियंत्रण ठेवणे कठीण आहे. कुणी कितीही बाता मारल्या. गैरव्यवहारावर नियंत्रण ठेवण्याचे आश्वासने दिली. याला काहीही अर्थ नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे सगळं सुरू असताना रस्त्यासारख्या ज्वलंत समस्येवर तोडगा निघणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असेल तर हा निर्लज्ज सदासुखीचेच उदाहरण आहे असे म्हणावे लागेल.
रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांनी 31 मार्च 2025 ची मुदत दिली होती. दिलेली मुदत कार्यकारी अभियंता विसरले नाही. नक्कीच त्यांना आठवणीत आहे. कार्यकारी अभियंता नागपूरचे. रस्ता अहेरीचा. त्यांना सोयरसुतक नाही. त्यांना फक्त नोकरी करायची आहे. दिवसं काढायची आहेत. आज यहा तो कल वहा. इसके सिवा जाना कहा. त्यांना काहीही घेणे देणे नसल्याने गुप्ता सारखे कंत्राटदार जनतेसाठी डोकेदुखी ठरत आहे. अधिकारी वर्ग जर उत्तम असेल, समय सूचकता असेल तर गुप्ता सारखे कंत्राटदार डोक्यावर चढणे शक्यच नाही. डोक्यावर चढण्याला अधिकारी कारणीभूत आहे हेही तेवढेच सत्य आहे. असा अधिकारी वर्ग विकासासाठी मारक ठरतो हे दिसून येत आहे.

