कर्मचारी अधिकारी गावाला पळाले
खातेदार वाऱ्यावर
अहेरी : 12 एप्रिल ला दुसरा शनिवार आला. 13 एप्रिल ला रविवार होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती ची १४ एप्रिलला सुट्टी होती. सार्वजनिक सुट्टी होती. सतत तीन दिवसाच्या सुट्टी आल्याने अहेरी येथे कार्यरत असलेल्या विविध बँकेचे अधिकारी व कर्मचारी गावाला पळाले. गावाला जाताना मात्र या अधिकाऱ्यांनी खातेदारांकडे दुर्लक्ष केले. स्थानिक एटीएम मध्ये रक्कम टाकण्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. यामुळे गेल्या दोन दिवसापासून अहेरी येथे असलेल्या सर्वच बँकांच्या एटीएम मध्ये रकमेचा ठणठणाट आहे. खातेदारांना वाऱ्यावर सोडले आहे. खातेदारांशी स्थानिक बँक अधिकारी व कर्मचारी या पद्धतीचा व्यवहार करीत असले तरी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.
अहेरी येथे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. या चारही बँकांकडून एटीएमची व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम सुरू करून या बँका खातेदारांना एटीएम सेवा उपलब्ध करून देत आहेत. ही सेवा सदोष असल्याचे लक्षात येते. या बँकांमध्ये कार्यरत असलेला अधिकारी वर्ग हा दूरच्या अंतरावरचा असल्याने व सातत्याने सुट्ट्या असल्या की कोणतीही पर्याय व्यवस्था केली जात नाही. या बँकांमध्ये स्थानिक कर्मचारी कार्यरत असले तरी अधिकाऱ्यांचा या कर्मचाऱ्यांवर विश्वास नसल्याचे चित्र आहे. स्वतः गावाला जातात. खातेदारांची व्यवस्था व्हावी म्हणून कर्मचाऱ्यांना एटीएम मध्ये रकमा टाकण्याच्या सूचना सुद्धा यांच्याकडून दिल्या जात नाही. याचा त्रास खातेदारांना भोगावा लागतो. स्थानिक बँकांवर वरिष्ठ बँक कार्यालयाचे नियंत्रण असते. या बँकांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा स्थानिक बँकांना भेटी देत नाही. त्यामुळे या परिसरात कार्यरत असलेले अधिकारी बिनधास्त झाले आहेत. सोबतच परिसरातील खातेदार सुद्धा जागरूक नाही. त्रास झाला व अडचण आली तर वरिष्ठांकडे तक्रार करून कळवित नसल्याने अधिकाऱ्यांना आपल्या मनमर्जीने काम करणे मोकळे झाले आहे.
शहरी भागात सुट्या असल्या तरी एटीएम मध्ये पैसे टाकण्याची व्यवस्था प्रत्येक बँक व्यवस्थापन करत असते. याची जबाबदारी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात येत असते. असा कोणताही प्रकार अहेरी येथे करण्यात आला नसल्याने बँकांच्या सेवेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

