अहेरी : होळी व रंगपंचमीच्या सणानिमित्ताने लागोपाठ तीन सुट्ट्या आल्या. मध्ये शनिवार आला. काही शिक्षक मतदार मंडळी शेजारच्या किंवा दूरच्या जिल्ह्यातील आहे. होळी महत्त्वाचा सण असल्याने शिक्षक मंडळी आपल्या मूळगावाकडे किंवा नातेवाईकाकडे गेली आहे. ही मंडळी आता सरळ सोमवारला येण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात मतदान कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था नोंदणी क्रमांक 186 च्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे मतदान दिनांक 16 मार्च 2025 ला होऊ घातले आहे. 16 मार्चचा रविवार आहे. शिक्षकाच्या व पतसंस्थेच्या कामकाजावर परिणाम पडू नये म्हणून रविवारच्या दिवसाचे नियोजन मतदानासाठी करण्यात आले. असे असले तरी सोळा च्या पूर्वीच होळीचा सण आला. महाराष्ट्रात होळीच्या सणाचे महत्त्व मोठे आहे. नोकरी निमित्ताने वास्तव्यास असणारा नोकरदार वर्ग हमखास या सणाला आपल्या मूळ गावी जात असतो. ग्रामीण भागात होळीच्या सणाची मजा काही औरच असते. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्यासोबत होळीचा सण साजरे करणे बहुतेकांना आवडते. यामुळे काही शिक्षक मतदार मंडळी आपल्या मूळ गावाकडे गेली आहे. दिनांक 13 मार्च ला होळीची सुट्टी होती. 14 मार्चला रंगपंचमीची सुट्टी आहे. 15 मार्चला शनिवार आहे. 16 ला रविवार आहे. याच दिवशी मतदान आहे. शनिवारच्या सुट्टीचा अर्ज टाकला तर सलग चार दिवसाच्या सुट्ट्या मिळतात. यामुळे काही शिक्षक आपल्या मूळ गावाकडे गेले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील व दुरच्या जिल्ह्यातील गावाकडे गेलेले शिक्षक मतदानासाठी येण्याची शक्यता अत्यल्प आहे. म्हणून पतसंस्थेच्या मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे.
बहुतेक शिक्षकांकडे चार चाकी वाहन आहे. नागपूर, वर्धा या जिल्ह्यातून चार ते पाच तासात अहेरी आल्लापल्लीपर्यंत पोहोचता येते. सोमवारी सकाळी निघून शाळा पकडता येते. असाही काही शिक्षकांचा बेत असू शकतो. हा बेत मतदानावर परिणाम पाडू शकतो.
डोकेदुखी
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची निवडणूक जबरदस्त रंगत आली आहे. एक-एक मतदार जुळविण्याचे काम दोन्ही पॅनल कडून सुरू आहे. प्रत्येक शिक्षक मतदाराने मतदान करावे. ते आपल्या बाजूने व्हावे हाच दोन्ही पॅनलचा प्रयत्न आहे. मोठ्या मतदानाची अपेक्षा दोन्ही पॅनलला आहे. होळीनिमित्त बाहेर गेलेले शिक्षक मतदार रविवारला कसे बोलवायचे ही एक मोठी डोकेदुखी सर्वच शिक्षक उमेदवारांसाठी निर्माण झाली. कसेही करा, काहीही करा पण मतदानासाठी वेळेच्या आत या अशी विनवणी करण्याशिवाय शिक्षक उमेदवारांपुढे दुसरा पर्याय नाही.
