विजयानंतरची प्रतिक्रिया
अहेरी : 1 ते 24 पर्यंत आश्वासने सोसायटी बचाव पॅनेलने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिली आहेत. आश्वासनांची पूर्तता करण्याला प्रथम प्राधान्य दिले जाईल. सप्टेंबर 2025 मध्ये आमसभेचे नियोजन आहे. आमसभेत चर्चा करून जाहीरनाम्याची पूर्तता करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात येतील. असे मत मावळते अध्यक्ष व सोसायटी बचाव पॅनलचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजू आत्राम यांनी व्यक्त केले. काल संपन्न झालेल्या निवडणुकीत मतमोजणीनंतर सोसायटी बचाव पॅनल ने एकतर्फी बहुमत मिळविले. 13 पैकी 13 संचालक निवडून आलेत. यावर प्रतिक्रिया घेतली असता प्रस्तुत प्रतिनिधीशी ते बोलत होते.
प्रश्न : प्रचंड यशाची कारणे सांगा.
उत्तर : या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, नऊ वर्षातल्या कामाचे हे यश आहे. मागील निवडणुकीत सोसायटी बचाव पॅनलने बहुमत मिळवले. 9 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. एकाही सभासदाला नाराज केले नाही. कोणतेही काम असेल तर तात्काळ केले. समस्या सोडविली. प्रत्येक सभासद समाधानी होता. मतदारांचे समाधान आम्हाला विजयापर्यंत घेऊन गेले असे ते म्हणाले.
प्रश्न : 28 लाखाचा मुद्दा कितपत फायदेशीर ठरला.
उत्तर : निश्चितच हा मुद्दा फायदेशीर ठरला. 28 लाखाची रक्कम मोठी रक्कम आहे. ही रक्कम सामान्य सभासदांची आहे. 2016 ला प्रभार सांभाळल्यानंतर या रकमेच्या शोधाच्या अनुषंगाने कामाला सुरुवात केली. गैरव्यवहार कसा करण्यात आला. याविषयी हळूहळू माहित होत गेले. करणारा व्यक्ती निश्चित करण्यात आला. पत्र देण्यात आलीत. मागील वर्षी ही रक्कम पतसंस्थेमध्ये भरण्यात आली. सोसायटी बचाव पॅनल कदाचित सत्तेवर आले नसते तर 28 लाख रुपये रकमेचा घोळही बाहेरही आला नसता. मुद्दा व्यक्तीचा नाही तर पतसंस्थेच्या रकमेचा आहे. हा मुद्दा आमच्या पॅनलने मतदारांना पटवून सांगितला. मतदारांनी यावर विचार मंथन केले. या मुद्द्याचा सुद्धा सकारात्मक परिणाम मतदानावर पडला. आमच्या विजयात हा मुद्दा महत्त्वपूर्ण आहे. वैयक्तिक विरोधाचा प्रश्न नाही. प्रश्न पतसंस्थेच्या रकमेचा आहे असे ते म्हणाले.
प्रश्न : लढत कशी झाली.
उत्तर : समता पॅनलने दिलेली लढत निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. समता पॅनलच्या उमेदवारांनी आणि समर्थकांनी सुद्धा प्रचारात प्रचंड मेहनत घेतली. निवडणुकीत स्पर्धा झाली. निकोप स्पर्धा होती. असे ते म्हणाले.

