लक्ष्मण रत्नम (शिक्षक)
(एम. ए. बी. एड.)
२४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनला ५ वर्षे पूर्ण झालीत. याच दिवशी संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्या क्षणापासून आज पाच वर्षे लोटली. या काळात आपला समाज, अर्थव्यवस्था, आरोग्यव्यवस्था आणि मानसिकता कशी बदलली, याचा आढावा घेणे महत्त्वाचे आहे.
- आरोग्य आणि जनजागृती:–
कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली. रुग्णालयांची क्षमता वाढवली गेली, वैद्यकीय संशोधनाला गती मिळाली आणि लोक स्वच्छतेबाबत अधिक जागरूक झाले. मात्र, त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. कोविड लसीबाबत संदिग्धता, मानसिक आरोग्य समस्यांचा वाढता प्रभाव आणि औषधांच्या किमतींतील वाढ.
- डिजिटल क्रांती आणि वर्क फ्रॉम होम:–
लॉकडाऊनमुळे ऑनलाइन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम ही संकल्पना अदयास आल्या. शिक्षणात डिजिटल साधनांचा वापर वाढला, पण तंत्रज्ञानाची उपलब्धता ही मोठी समस्या ठरली. ग्रामीण भागात अजूनही इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा अभाव जाणवतो, हे सत्य स्वीकारणे क्रमप्राप्त ठरेल.
- अर्थव्यवस्था आणि नोकऱ्या:–
लॉकडाऊनच्या पहिल्या काही महिन्यांत अनेक उद्योग ठप्प झाले, लाखो लोक बेरोजगार झाले. पण त्यानंतर अर्थव्यवस्थेने हळूहळू वेग घेतला. ऑनलाईन व्यापाराला गती मिळाली, आणि लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळाली. मात्र, महागाई आणि उत्पन्नातील असमानता यामुळे अनेक सामान्य नागरिक आजही उत्पन्न वाढविण्यास संघर्ष करीत आहेत.
- समाजाची मानसिकता:–
या पाच वर्षांत लोकांची वैचारिक बाबीत खूप बदल झालेला आहे. महामारीमुळे लोकांनी आरोग्य, आर्थिक सुरक्षितता आणि कौटुंबिक नातेसंबंध यांना अधिक महत्त्व द्यायला सुरुवात केली. काहींनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला, तर काहींना मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. ऑनलाइन गोष्टी, ध्यानसाधना आणि फिटनेस या गोष्टींना लोकांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
- बदललेल्या जीवनशैलीचा प्रभाव:–
रहदारीत आणि प्रवासाच्या बाबतीत मोठा बदल झाला. लोकांनी कमी गर्दीच्या ठिकाणी जाणे पसंत केले. खानपानामध्ये खूप बदल झाले. घरगुती स्वयंपाकाला प्राधान्य मिळाले. ऑनलाइन खरेदीने प्रचंड गती मिळाली, परिणामी पारंपरिक बाजारपेठांवर त्याचा परिणाम झाला. लोक आता गरजांवर अधिक लक्ष देत आहेत आणि अनावश्यक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकंदरीत, लॉकडाऊन नंतरच्या पाच वर्षांत समाजाने अनेक अडथळे पार केले आणि नव्या संधीही मिळवल्या. काही क्षेत्रांत प्रगती झाली, तर काही क्षेत्रे अजूनही सावरत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कठीण काळाने आपल्याला जीवनाच्या अस्थिर आहे याची जाणीव करून दिली आणि भविष्यात होणारे बदल स्वीकारण्याची सवय लावली. पुढच्या काळात, या अनुभवांचा उपयोग करून अधिक मजबूत समाज निर्माण करणे आपले मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.