‘सुरजागड : विकास की विस्थापन ?’ हे पुस्तक जल, जंगल, जमीनीवर व स्वतःवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने वाचावं असं आहे. मी स्वतःवर म्हटलं, कारण हे जे वास्तव या पुस्तकात लिहीलं गेलंय, ते अत्यंत खरंखुरं आहे.
विकासाच्या परिभाषेतून कित्येक येणाऱ्या पिढ्या बळी ठरणार आहेत. येणाऱ्या कित्येक वर्षानंतर इथल्या खाणी जेव्हा भूईसपाट होतील, इथली वनसंपदा संपेल आणि इथली संपूर्ण मानवजात जेव्हा प्रदुषणाची बळी ठरेल, तेव्हा स्वःत्व सुद्धा संपेल. परिणामी सारंच संपेल. आता जे आम्ही गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी, निसर्गाचे पुजक म्हणून अभिमान बाळगतो, ते ही संपेल.
इथल्या अनेकांना हे पुस्तक स्वतःच्या भावना शब्दात मांडल्या सारख्या वाटतील. कित्येक दिवसांची मनातील धग शब्दात मांडल्या सारखं, मनातील अस्वस्थता शब्दात वाचल्यासारखं मला वाटलं.
हा जो सरकारने विकास आम्हावर न मागता थोपवला आहे, हा विकास आमच्या आदिवासी बांधवाच्या जिवावर, संस्कृतीवर उठला आहे. जो इकडे वास्तव्य करणाऱ्या कित्येक नागरिकांना नकोय. याचे प्रतिनिधिक स्वरूप म्हणजे हे पुस्तक आहे.
इथले राजकारणी, पुढारी, लोकप्रतिनिधी, बधिर झालेली पत्रकारिता सगळेच मुग गिळून गप्प बसले आहेत. अनेक लोक या विकासाच्या ओझ्याखाली दाबली जाताय आणि ही सगळीच हेळसांड विकास विकास म्हणणाऱ्या नेत्यांना अत्यंत प्रिय वाटताय.
जिथली नैसर्गिक वनसंपदा, जैवविविधता जगात नावाजली जात होती. त्या वनसंपदेचा ऱ्हास उघड्या डोळ्यांनी बघतांना आम्हा इथल्या व ग्रामसभेसाठी अहोरात्र झटणाऱ्या माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना या निमित्ताने अनेक प्रश्न इथल्या व्यवस्थेला ओरडून विचारावे वाटताय.
इथले रस्ते तर आमच्या संपूर्ण शरीराचे हाडे ठिसूळ करूनच दम घेणार की काय? असे वाटतंय. जर चुकून आमच्या पालकमंत्र्याचा ‘विमानाचा’ ड्रिम प्रोजेक्ट उदयास व पुर्णत्वास आला तर कृपया आमच्या जनतेवर कृपा म्हणून विमान फेरीसाठी गावागावा अंतर्गत पासेस उपलब्ध करून द्यावीत, ही मागणीही करावीशी वाटते आहे.
हे पुस्तक वाचतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ह्या आमच्या साध्याभोळ्या बांधवांचा त्यांच्या साधेपणाचा, त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा इथली व्यवस्था अगदी चांगल्या प्रकारे करून घेत आहे.
बेरोजगारी, आरोग्य, शिक्षण, विज, रस्ता यासारखे अनेक प्रश्न सोडवायचे सोडून सरकार नवी प्रश्न उभे करताय. आमच्या तरुण लोकांच्या हातात काठ्या देऊन, त्यांना रोजगार प्राप्त करुन देताय आणि मोठमोठाले करार करुन स्टिल हब बनवताय. इथल्या लोकांना आणखी पांगळं बनविण्याच काम जोमाने करताय. अनेकाचा आवाज अनेक आमिष देवून दाबल्या जाताय.
यासाठी ना सरकारला प्रश्न विचारता येताय, ना इथल्या व्यवस्थेला.
पुढे येणारा विनाश, इथलं प्रदुषण सारंच मानव जातीला बोथट करणारं आहे. यासाठी जे आवाज उठवताय त्यांना सरळ ही व्यवस्था संपवून टाकताय.
इथल्या लोकांनी त्यांना नको असलेल्या विकासासाठी गोंडस आशा दाखवल्या जाणाऱ्या दिवास्वप्नांच्या विरोधात लढा लढायचा तरी कसा? असे अनेक प्रश्न कित्येक दिवसांपासून कित्येकांच्या मनात उपस्थित होत असेल.
हे पुस्तक वाचून थोडी शांतता मिळाली. बरेच दिवसांपासून मनात सुरू असलेल्या अनेक गोष्टींची जाण पुस्तकातून झाली. फार सुंदर आणि शोधपुर्ण व अर्थपूर्ण लिखाण झालेले आहे.
निसर्गाला ओरबाडून, मानवी हक्काची पायमल्ली करुन झालेला विकास इथल्या कुठल्याच नागरिकांना नकोय. त्या सगळ्यांचा आवाज ह्या पुस्तकरूपांनी शब्दांकित केल्याबद्दल माझ्यासारखी जल, जंगल आणि जमीन यांना श्वास मानणारी सगळीच लोक या पुस्तकासाठी कृतज्ञ असणार आहेत.
- प्राजक्ता सचिन पैदापल्लीवार माजी मानगरपंचायत अध्यक्ष अहेरी

