पल्ले-रापेल्ली रस्त्याची अवस्था बिकट
पेरमिली : पेरमीली-पल्ले-रापेल्ली-एकरा हा जवळपास 15 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्यावर कंत्राटदाराकडून दोन मोठ्या पुलांची निर्मिती करण्यात आली आहे.
पूल पूर्ण बांधून झाला आहे. दोन्ही बाजूने मुरूम, डांबर टाकून अप्रोच रोड तयार करायचा आहे. अप्रोच रोडचे काम कंत्राटदाराने थांबवलेले आहे. पावसाळ्यात कंत्राटदार हे काम करेल असे वाटत नाही. यामुळे पावसाळ्यात एकरा, रापेल्ली, पल्ले या गावातील जनतेस अडचण होणार आहे. कंत्राटदाराने अप्रोच रोडचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी गावातील जनतेकडून करण्यात आली आहे.
पेरमिली पल्ले, रापेल्ली, एकरा हा जवळपास 15 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याला जोडून परिसरातील सात-आठ गावे आहेत. या रस्त्यावर असलेल्या नाल्यांवर पूल बांधण्याचे काम या उन्हाळ्यात करण्यात आले. पेरमीली, पल्ले, रापेल्ली या गावादरम्यान दोन मोठे पूल तयार करण्यात आले. तूर्तास बाजूने वळण रस्ता तयार करण्यात आला आहे. या वळण रस्त्यावरून जनता दुचाकी व चारचाकी वाहनांची वाहतूक करत आहे. येत्या पंधरा दिवसात पावसाला सुरुवात होणार आहे. मान्सून लवकर येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या गावांना पेरमीलीकडे जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्यायी रस्ता नाही. पुलाच्या बाजूला मुरमाचा भर टाकून अप्रोच रोड तयार करण्यात आला नाही तर या परिसरातील पाच-सहा गावांची अवस्था ‘घर का ना घाट का’ अशी होणार आहे. पावसाळ्यातील तीन महिन्यात संपर्क पूर्णपणे तुटणार आहे. यामुळे या 15 दिवसात या दोन्ही पुलाच्या बाजूने मुरमाचा भर टाकून जाणे-येणे करण्यायोग्य रस्ता तयार करणे अत्यावश्यक आहे.
पेरमेली-पल्ले-रापेल्ली हा रस्ता पावसाळ्यात जनतेसाठी डोकेदुखी ठरू शकते हे कंत्राटदाराला चांगल्या प्रकारे माहीत असताना हेतूपुरस्पर कंत्राटदार या पुलाच्या अप्रोच रोडच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. कंत्राटदाराला स्थानिक जनतेप्रती कोणतीही सहानुभूती नाही हे या रस्त्याच्या कामातून दिसून येत असल्याने संबंधित विभागाने कंत्राटदाराला तात्काळ निर्देश द्यावे अशी जनतेची मागणी आहे.

