अहेरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ पुणे कडून राज्यातल्या विविध विभागीय मंडळा अंतर्गत वर्ग बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च च्या दरम्यान घेण्यात आली. 10 दिवस आधी सुरू झालेल्या परीक्षेचा निकाल परीक्षा मंडळ तब्बल एक महिन्यापूर्वी म्हणजे आज जाहीर करीत आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणारा निकाल मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर होत असल्याने शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर प्रचंड दबाव असल्याचे दिसून येत आहे. माझा निकाल कसा असेल, माझ्या कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल कसा असेल याचे टेन्शन कालपासूनच शिक्षक व विद्यार्थ्यांवर दिसायला लागले आहे.
आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाकडून निकाल जाहीर करण्यात येत आहे. एक आठवड्यापूर्वी परीक्षा मंडळाकडून तसे जाहीर करण्यात आले होते. दिलेल्या सूचनेनुसार परीक्षा मंडळांनी काल एका प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.
दुपारी एक वाजता परीक्षा मंडळाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता निकाल जाहीर करण्यात येत असला तरी या वर्षीच्या परीक्षेत मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत कॉपीमुक्त परीक्षा राबवण्याचा निर्णय घेतला. यातून यावर्षी संपूर्ण राज्यात परीक्षेचे चित्र बदलले. विविध भरारी पथकांच्या माध्यमातून भेटी देण्यात आल्या. सीसीटीव्ही कॅमेरे, झूम कॅमेरे इत्यादीच्या माध्यमातून परीक्षेचे जिवंत चित्रण यंत्रणेपर्यंत पोहोचविण्यात आले. यामुळे नक्कल करणे अनेकांना जमले नाही. यातून निकाल कमी होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. नक्कल करताना सापडल्यास केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक यांच्यावर विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्याने शिक्षक मंडळी सुद्धा धास्तावली होती. यातून बऱ्याच परीक्षा केंद्रावर नक्कल झाली नाही. याचा परिणाम थेट निकालावर पडणार आहे. पूर्वी 100% निकाल देणाऱ्या शाळा यावर्षी निकालात घसरण्याची शक्यता आहे. दुपारी 1:00 वाजता पर्यंत शिक्षक व विद्यार्थी दोघांमध्ये निकालाची चर्चा रंगणार आहे.
