लोकसभा निवडणुकीनंतर आलेच नाही
बॅनरचीही वाणवा
अहेरी : एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणुक आटोपली. मतदारांनी परिवर्तन केले. जनतेने अशोक नेते यांना बसवून किरसाणांना उभे केले. प्रचंड मतांनी निवडून दिले. अहेरी विधानसभा मतदारसंघातून त्यांना लक्षणीय मते मिळाली. निवडणुका आटोपल्या. एक वर्ष झालं. चिमूर -गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य डॉ. नामदेव किरसाण यांचे अहेरी विधानसभा मतदारसंघात एक वर्षापासून दर्शन दुर्लभ झाले आहे.
डा.नामदेव किरसाण यांच्या कार्यालयाकडून आणि समर्थकांकडून समाज माध्यमांवर प्रामुख्याने विवाहास उपस्थित असल्याचे फोटो तेवढे वायरल केले जात आहे. हे सर्व फोटो गडचिरोली, आरमोरी व अन्य मतदार संघातील आहे. अहेरी विधानसभा मतदार संघात होणाऱ्या एकाही वैयक्तिक व सामाजिक कार्यास त्यांनी उपस्थिती दर्शविली नाही. तब्बल एका वर्षापासून त्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.
मागील दोन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये डॉ. नामदेव किरसाण चिमुर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघात ‘ऍक्टिव्ह’ मोडमध्ये होते. अहेरी विधानसभा मतदारसंघात सुद्धा त्यांचा ‘ऍक्टिव्ह’ मोड दिसून येत होता. दोन-चार महिन्यातून अहेरी विधानसभा मतदारसंघात त्यांचे दौरे व्हायचे. भारतीय सण आणि जयंती, पुण्यतिथी निमित्याने गावागावात बॅनर झळकत होते. यातून त्यांनी चांगलीच सहानुभूती मिळवली होती. 2024 मध्ये संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी उत्तमरीत्या केल्याने याचा फायदा लोकसभा निवडणुकीत झाला. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अशोक नेते यांचे दहा वर्षातील काम दखल घेण्यासारखे नसल्याने बहुतेक मतदार संघात किरसाणांना ‘लीड’ मिळाली. किरसाण लोकसभा निवडणुकीत एकतर्फी जिंकले. अहेरी विधानसभा मतदारसंघात किरसाणांना अशोक नेते पेक्षा जास्त मते मिळाली. येथे किरसान यांनी अशोक नेते यांना चांगलीच धोबीपछाड दिली.
लोकसभा निवडणुकीत किरसाण विजयी झाले आणि अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या जनतेच्या अपेक्षा वाढल्या. अहेरी विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या आहेत. या समस्या डॉ. नामदेव किरसाण मार्गी लावतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी ही मोठी समस्या आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि कंत्राटदार जनतेच्या भावना समजून घ्यायला तयार नाहीत. हा प्रश्न वरिष्ठ पातळीवर मांडून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी चे बांधकाम या जून पर्यंत आटोपने गरजेचे आहे. अशा परिस्थितीत डॉ. नामदेव किरसान यांचे दोन-चार दौरे अपेक्षित असताना गेल्या एक वर्षापासून किरसाण यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाकडे तोंड फिरवल्याचे दिसते. चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसच्या खासदाराकडे असताना काँग्रेस कडूनच चक्काजाम आंदोलनाचा आजचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेसकडून चक्काजामचा इशारा देण्यात आल्याने जनता या महामार्गावर सहन करत असलेल्या हालअपेष्टांची चांगलीच कल्पना खा. किरसान यांना आहे
भौगोलिकदृष्ट्या चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघ प्रचंड विस्तारलेला आहे. गोंदियाच्या आमगाव पासून तर सिरोंचा पर्यंत या मतदारसंघाची व्याप्ती पसरलेली आहे. संपर्क त्रासदायक आहे. रस्ते बरोबर नाहीत. जनता मेतकूटीस आली आहे. नेमके हेच किरसाणांना समजून घ्यायचे असताना किरसान यांनी अहेरी विधानसभा मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याने लोकसभेत आमच्या समस्या कोण मांडेल ?असा प्रश्न जनता आता एकमेकांना विचारत आहे.
यासंदर्भात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल निसार हकीम यांची प्रतिक्रिया विचारली असता खासदार किरसाण लवकरच आहे रे विधानसभा मतदारसंघात दौऱ्याचे आयोजन करणार असल्याची त्यांनी कळविले. अहेरी विधानसभा मतदारसंघ अंतराच्या दृष्टीने किरसानांसाठी गैरसोयीचा असला तरी मिळालेल्या मताच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. अहेरी मतदारसंघात मिळालेली ‘लीड’ पाहू जाता या मतदारसंघातील मतदारांना किरसानांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात किरसाण किती यशस्वी होतात हे भविष्यात कळेलच.
बॅनरची वानवा
निवडणुकीपूर्वीच्या दहा वर्षाचा मागवा घेतला तर मागील दहा वर्षात किरसान लोकसभेच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने चांगलीच सक्रिय होते. अहेरी विधानसभा मतदारसंघातल्या लहान मोठ्या गावांमध्ये भारतीय सण आणि जयंती पुण्यतिथीचे त्यांचे बॅनर हमखास दिसायचे. सिरोंचा तालुक्याच्या असरलीपर्यंत हे बॅनर दिसत होते. लोकसभा निवडणूक संपली. विजयाची पताका फडकविली. बॅनरची संख्या, दिवस वाढणे अपेक्षित असताना शुभेच्छांचे बॅनर पूर्णपणे बंद झाले. अहेरी विधानसभा मतदार संघातल्या नागरिकांना शुभेच्छा मिळणे सुद्धा दुर्मिळ झाले आहे.
