तोडगा काढा, गावकऱ्यांची मागणी
पेरमिली : मागील सात वर्षांपूर्वी स्थानिक परिसरातील नक्षलग्रस्त भागात वाहतुकीला सोयीचे व्हावे म्हणून बेली ब्रिज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. यापैकी एक बेलि ब्रिज पेरमिली-दामरांचा रस्त्यावरील एरमनार जवळ असलेल्या मोठ्या नाल्यावर तयार करायचा होता. निविदा निघाल्या. कोलकात्याच्या एका कंत्राटदाराला काम मिळाले. कंत्राटदराने बेली ब्रिजचे लोखंडी साहित्य नाल्याजवळ आणून टाकले. कामाला सुरुवात केली नाही. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदारात वादाची ठिणगी पडली. पुलाचे काम थांबले. गेल्या तीन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली आणि कंत्राटदार दोघेही अडून बसले आहेत. यात स्थानिक परिसरातील जनता भरडली जात आहे.
पेरमिली – दामरांचा रस्त्यावर पेरमिली पासून पाच किलोमीटर अंतरावर मोठा नाला आहे. या नाल्यावर पूर्वी रपटा होता. पावसाळ्यात रपट्यावरून पाणी वाहत असल्याने या नाल्यावर मोठा पूल तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. बेली ब्रिजच्या बांधकामासाठी जुना रपटा होता. तो सुद्धा पाडण्यात आला.सात-आठ वर्षांपूर्वी परिसरात नक्षल चळवळ जोमाने सक्रिय होती. रस्ता बांधकामाला नक्षल चळवळीचा विरोध असल्याने येथे मोठ्या पुलाचे बांधकाम तात्काळ करणे शक्य नव्हते. अशा परिस्थितीत या नाल्यावर बेली ब्रिज बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीकडून निविदा काढण्यात आल्या. कोलकात्याच्या एका कंत्राटदाराने निविदा भरली. त्याला कामही मंजूर झाले. काम मंजूर झाल्याने जवळपास एक करोडचे लोखंडी साहित्य कंत्राटदाराने या ठिकाणी आणून टाकले. लोखंडी साहित्य टाकल्यानंतर साहित्याच्या रकमेची मागणी त्याने सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीकडे केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रक्कम देण्यास नकार दिला. काम सुरू करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या. कंत्राटदार रकमेवर अडून बसला. सार्वजनिक बांधकाम विभाग कामावर अडून बसला. यात जवळपास तीन ते चार वर्षे निघून गेले आहेत. दोघेही आपापल्या जागेवर ठाम आहेत.तीन ते चार वर्षापासून कोणताच तोडगा निघाला नसल्याने पुलाचे बांधकाम थांबले आहे. प्राप्त माहितीनुसार बेली ब्रिज साठी टाकण्यात आलेले लोखंडी साहित्य काही प्रमाणात चोरीला गेले असल्याची चर्चा सुद्धा आहे. तीन ते चार वर्षापासून पुलाचे बांधकाम थांबलेले असताना सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदाराला पुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी बाध्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. बांधकामा संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदार यांच्यात करार होत असतो. करारानुसारच काम करून घ्यावयाचे असते. कंत्राटदार कराराचे उल्लंघन करीत असेल तर त्याच्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली कडून कारवाई व्हायला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीला कंत्राटदाराला रक्कम द्यायची असेल तर ती द्यायला पाहिजे. ठरलेल्या करारानुसार काम करून घ्यावयाचे असताना याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली हेतू पुरस्कार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याचा फटका या परिसरातील जवळपास 30 ते 40 गावांना बसत आहे.
येरमनार नाल्यावरील पूल महत्वपूर्ण आहे. दामरंचा साठी हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे पेरमिली-दामरांचा हा फक्त 22 किलोमीटरचा रस्ता आहे. रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण झालेले आहे. येथे बारमाही बस सेवा सुरू होऊ शकते. येरमणार पुलातच घोडे अडले आहे. या पुलाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना मात्र त्रास भोगावा लागत आहे.
तोडगा काढा
सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली कडून दुर्लक्ष होत असले तरी यावरचा कायमस्वरूपी तोडगा तात्काळ काढणे गरजेचे आहे. दामरांचा येथील इंद्रावती नदीवर आंतरराज्य पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. पुढच्या वर्षी पर्यंत हा पूल बांधला जाण्याची शक्यता आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक वाढणार आहे. आल्लापल्ली, पेरमिली दामरनचा मार्गे आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यासाठी हा पूल महत्त्वपूर्ण असल्याने या पुलावर तात्काळ तोडगा काढणे गरजेचे आहे. कंत्राटदार इच्छुक नसल्यास सदर पुलाचे बांधकाम रद्द करून सिमेंट काँक्रीट चा पूल येथे तयार करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

