अहेरी : 25 वर्षा आधी पत्र म्हणजे जीव की प्राण. नोकरी निमित्ताने किंवा शैक्षणिक कामा निमित्ताने ज्यांची नातेवाईक मंडळी दूरवर राहत होती ती मंडळी पत्राद्वारे आपली खुशाली कळवित होती. पत्र येईल. बातमी कळेल. या आशेने ही मंडळी पोस्टमनकडे डोळा लावून बसलेली असायची. गावात पोस्टमन दिसला की त्याच्याकडे पत्राबाबत वारंवार विचारणा करायची. मोबाईल निघाले. प्रत्यक्ष संपर्काला सुरुवात झाली. पत्राचे महत्त्व संपले. पोस्टात पत्र येतात पण बहुतेक कार्यालयीन कामांची असतात. वैयक्तिक पत्र बंद झाली आहे. पोस्टाच्या पेटीत कोणी पत्रच टाकत नाही. कार्यालयीन कामांचे पॉकेट पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन रजिस्टर्ड केल्या जातात. बदलत्या परिस्थितीनुसार पोस्टाच्या पेट्या शोभेच्या वस्तू झाल्या आहेत. ज्या गावात पेटी असेल त्या गावातल्या नवीन पिढीला ही पोस्टाची पेटी आहे हे थोडेफार समजत आहे पण ज्या गावात पोस्टाची पेटी नसेल किंवा पोस्ट कार्यालय नसेल त्या गावातल्या नवीन पिढीला पोस्टाची पेटी कशी असते हे सुद्धा माहित नाही.
पंचवीस वर्षे आधी पत्राचे खूप महत्त्व होते. पत्रासोबत तार, मनीऑर्डर हा प्रकारही अस्तित्वात होता. बाहेरगावी शिकणाऱ्या मुलांना मनीऑर्डरच्या माध्यमातून रक्कम पाठविली जायची. गंभीर बातमी असेल तर तातडीने तार केल्या जायची. दिवाळी, इंग्रजी नवीन वर्ष व मराठी नवीन वर्ष आले तर शुभेच्छा पत्र पाठविले जायचे. यामुळे पोस्टमन चा गावात नियमितपणे राबता असायचा. ग्रामीण भागासाठी पोस्टमन महत्त्वाचा माणूस झाला होता. बऱ्याच लोकांना अक्षर ज्ञान नव्हते. आलेली पत्र शाळा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेतली जायची. पत्रात वेगळेपण व आपुलकी होती.
काळ बदलला. जगाने माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती केली. स्मार्टफोन निघाला. आणि पत्र गायब झाले. वर्षानुवर्षे वैयक्तिक पत्र येत नाही. कार्यालयीन पत्र तेवढे मिळतात.
पोस्टमनचे महत्व संपले.
‘डाकिया डाक लाया’ अशी हिंदीत कविता होती. गुरुजी शिकवायचे. विद्यार्थ्यांना मजा वाटायची. डाकिया म्हणजे पोस्टमन. हिंदीत पोस्टमनला डाकिया म्हणतात. मराठीत 99.99% लोकांना पोस्टमनचे नाव माहीतच नाही. पूर्वी खाकी कपडे घालून पोस्टमन घरी यायचा. आताच्या पोस्टमनला खाकी युनिफॉर्मच नाही. कार्यालयीन पत्र देण्यासाठी जीन्स पॅन्ट आणि टी-शर्ट वरचा पोस्टमन घरी येतो. कोण आहे समजतच नाही. महत्त्व संपले आहे. काही पोस्टमन तर घरी येण्यासाठी सुद्धा टाळाटाळ करतात. बऱ्याच डाकेवर भ्रमणध्वनी क्रमांक असतो. पोस्टमन संपर्क करतो. डाक असणारा व्यक्ती पोस्टात जातो डाक घेतो. घरी येण्याची कंजूशी पोस्टमन करीत आहे. पोस्टाचा कारभार मनमानी आहे.
बदलत्या काळानुसार 95 टक्के लोकांचे पोस्टासोबत संबंध येत नसल्याने पोस्ट खात्याची बऱ्याच लोकांना माहिती नाही. पत्रपेटी तर दूरच.

