संविधानामुळे सुरक्षित
रियाज शेख यांचे प्रतिपादन
अहेरी:– भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान तयार करून देशाला अर्पित केल्यामुळेच सर्वांची सुरक्षितता आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट)जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांनी केले. स्थानिक बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळ अहेरीच्या वतीने आयोजित 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी विचार पिठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक तथा बौद्ध मंडळ अहेरीचे संस्थापक अध्यक्ष नारायणजी अलोणे होते, तर उदघाटन स्थानी ज्येष्ठ महिला सुगंदाबाई ओंडरे होत्या.प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एकनाथ चांदेकर, सचिव सुरेंद्र अलोणे, नगर सेविका मीनाताई ओंडरे, सामाजिक कार्यकर्त्या पौर्णिमा मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी रियाज शेख यांनी, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजाचा सर्वसमावेशक विचार करून ‘भारतीय संविधान’ तयार केले. भारतीय संविधानामुळे सुरक्षितता प्राप्त झाली असून सरकारची एखादी प्रक्रिया किंवा धोरण आपल्याला पटत नसल्यास लोकशाही पद्धतीने विरोध करून त्याला दुरुस्ती करण्याचे विधायक मार्ग संविधानात दिले असल्याचे आवर्जून उल्लेख करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय, ऐतिहासिक , महत्त्वपूर्ण घटना व घडामोडीवर प्रकाश टाकून मोलाचे मार्गदर्शन यावेळी रियाज शेख यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत भिमटे यांनी तर सूत्रसंचालन राहुल गर्गम यांनी केले, उपस्थितांचे आभार सुरेंद्र अलोणे यांनी मानले.यावेळी बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.

