आलापल्ली : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी समस्यांचा ‘खजाना’ झाला आहे. समस्यांच्या या खजाण्यात या मार्गावर प्रवास करणारे प्रवासी भरडल्या जात असून या मार्गावर प्रवास करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धुळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेकांना धुळीचे गंभीर आजार जडले आहेत. उपचारार्थ चंद्रपूर, नागपूर येथे जावे लागत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी आल्लापल्ली सिरोंचा हा 100 किलोमीटरचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम गेल्या आठ वर्षापासून रखडले आहे. कंत्राटदार वेळकाढू धोरण अवलंबित आहेत.
वेळकाढू धोरणाचा फटका या मार्गावर प्रवास करणाऱ्या जनतेला होत आहे. कंत्राटदाराकडून रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. बऱ्याच ठिकाणी काम बंद आहे. रस्त्यावर माती पसरली आहे. बस ट्रक किंवा अन्य चारचाकी वाहन या रस्त्यावरून गेले की दुचाकी धारकांना मोठा त्रास होतो. प्रचंड धूळ उडते. धुळीपासून बचाव करण्याचा कोणताही मार्ग शिल्लक राहत नाही. धूळ प्रवास करणाऱ्या जनतेच्या नाकात-तोंडात जाते, अंगावर असलेले कपडे पूर्णपणे धुळीने माखून जातात.
नोकरी निमित्ताने या मार्गावर अनेक जण दैनंदिन येणे-जाणे करत असतात. याचा त्रास त्यांना मोठा होतो. व्यवसायानिमित्ताने या मार्गावर मोठी वर्दळ असते. त्यांनाही याचा त्रास होत आहे. अनेकांना या धुळीमुळे दम्याच्या त्रासाला सुरुवात झाली आहे. बरेच जण चंद्रपूर-नागपूर येथे जाऊन उपचार करून घेत आहे. ही या रस्त्यावर उडालेल्या धुळीची देण आहे.
गेल्या आठ वर्षापासून हा रस्ता अडकला. थोड्याफार प्रमाणात कामाला सुरुवात झाली असली तरी कामाचा वेग अत्यंत कमी आहे. राजकीय नेत्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. निवडणूक आली की रस्त्याचे राजकारण करायचे. गेली की दुर्लक्ष करायचे असा प्रकार सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना तर रस्त्याचा विषय सामाजिक होऊ शकतो असे वाटतच नाही. त्यांना हा विषय राजकीय वाटतो. रस्त्याचा त्रास समाजाला होत आहे याकडे सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष नसल्याने या रस्त्याच्या समस्येचा सध्यातरी कुणीच वाली नाही.

