चामोर्शी : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या चामोर्शीच्या एका शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेवर ग्रामस्थांनी अश्लील कृत्याचा आरोप केला आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी यांच्याकडे एक महिन्यापूर्वी लेखी स्वरूपात तक्रार केली. संवर्ग विकास अधिकारी यांनी तक्रारी ला एक महिना दाबून ठेवले. यामुळे या प्रकरणात संवर्ग विकास अधिकारी चामोर्शीची ची भूमिका सुद्धा संशयास्पद असल्याचे लक्षात येत आहे.
मुख्याध्यापक आणि महिला शिक्षिकेचा प्रकार मागील शैक्षणिक सत्रापासून सुरू असून विद्यार्थ्यांनी पालकाकडे तक्रार केल्याने उघडकीस आला आहे. या प्रकारात अडथळा ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकाकडून मारहाण सुद्धा झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी यांना तब्बल एक महिन्यानंतर जाग आली. त्यांनी या प्रकाराची प्राथमिक चौकशी केली यात मुख्याध्यापक आणि शिक्षिका दोषी आढळल्याचे लक्षात आले आहे.
शिक्षणासारखे पवित्र क्षेत्रात आणि चामोर्शीसारख्या जागृत तालुक्यात सदरचा प्रकार घडल्याने या प्रकाराचा सर्वच पातळीवरून निषेध होत असून जिल्हा परिषद या दोघांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या प्रकरणात सहभागी असलेल्या मुख्याध्यापक आणि शाळेत विज्ञान विषयाचे अध्यापन कार्य करीत असलेली शिक्षिका या दोघांकडून हा प्रकार मागील शैक्षणिक क्षेत्रापासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील शैक्षणिक क्षेत्रात सुट्ट्या लागल्यानंतर सुद्धा हे दोघेही काही ना काही कारण काढून शाळेत यायचे आणि बंद खोलीत असायचे असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
शाळेच्या नियमित वेळात विद्यार्थ्यां समोरच अश्लील कृत्य करायचे. विद्यार्थ्यांनी यात अडथळा निर्माण केल्यास त्यांना मुख्याध्यापकाकडून मारहाण सुद्धा करण्यात आली आहे. या प्रकाराबाबत गावकऱ्यांकडून समज सुद्धा देण्यात आली होती मात्र कोणताही परिणाम या दोघांवर झाला नाही. दिनांक 30 जानेवारी 2025 ला शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सदरची तक्रार संवर्ग विकास अधिकारी चामोर्शी यांच्याकडे नोंदविली. समाजासाठी सदर प्रकार गंभीर स्वरूपाचा असला तरी संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती चामोर्शी आणि गटशिक्षणाधिकारी चामोर्शी यांनी हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला नाही. तब्बल एका महिन्याने या प्रकाराची चौकशी केली विद्यार्थ्यांचे बयान घेतले. प्राप्त बयानाच्या आधारावर हे दोन्ही महाभाग दोषी आढळल्याचे सांगण्यात येत आहे.
चामोर्शी येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत घडलेल्या या प्रकारामुळे समाजमन ढवळून निघाले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या दोन जबाबदार व्यक्तींकडून घडलेला प्रकार शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राला काळीमा फासणारा आहे. त्यामुळे या दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
