विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसाठी जबाबदार कोण ?
चामोर्शी : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जयनगर येथील मुख्याध्यापक आणि विषय शिक्षिका यांच्या अशोभनीय कृत्याचे प्रकरण जिल्हा परिषद गडचिरोली मध्ये प्रचंड गाजत आहे. शिक्षकी पेशाला न शोभणाऱ्या प्रकाराची गावकऱ्यांनी पंचायत समिती चामोर्शी आणि जिल्हा परिषद गडचिरोलीकडे केली. गावकऱ्यांच्या तक्रारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीने केराची टोपली दाखवली. ”गाढवा पुढे वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता” अशी तक्रारीची अवस्था करून ठेवली. ”निर्लज्ज सदा सुखी” या म्हणीची प्रचिती देत लैला-मजनूने ग्रामशिक्षण समितीला वकिलामार्फत नोटीस बजावली.
या सगळ्या प्रकाराने गावकरी प्रचंड संतापले असून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जयनगरला टाळे ठोकले. आज तिसरा दिवस आहे. शिक्षण विभागाला काहीही घेणे-देणे नाही. कोणताही तोडगा निघालेला नाही. ऐन परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जयनगर येथे कार्यरत मुख्याध्यापक आणि विषय शिक्षिकेचे प्रकरण चव्हाट्यावर आले. या दोघा विवाहित शिक्षकांची अनोखी प्रेम कहानी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना सांगितली. या दोघांच्या ”इश्क” मध्ये आपण अडथळा ठरत असल्याने आपणास मारहाण करतात असेही चिमुकल्यांनी पालकांना सांगितले. शाळेच्या आवारात नसले उचापती धंदे करणाऱ्या या लैला-मजनू वर वचक निर्माण व्हावा. शिक्षकी पेशात आल्यानंतर त्या पेशाची जाण निर्माण व्हावी या अनुषंगाने गावकऱ्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद कडे लेखी स्वरूपात तक्रार नोंदविली. चौकशी समिती गठीत झाली. पण चौकशी समिती केवळ फार्स ठरली. विद्यार्थी पालकांचे बयान घेतले. सक्षम कारवाई करण्यात आली नाही. दोघांनाही एकाच पंचायत समितीमध्ये ठेवण्यात आले. प्रतिनियुक्ती केली. गाव फक्त बदलविले.
एकंदरीत लैला-मजनूचा बचाव करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग कडून होत असल्याचे स्पष्ट आहे. शिक्षक विद्यार्थ्यांसाठी आदर्श असतात. शिक्षकांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांवर प्रभाव पाडते. व्यक्तिमत्व आजन्म लक्षात असते. मग विद्यार्थी शिक्षकांच्या विरोधात कसे काय बयान देतील. पंचायत समितीच्या लक्षात आले नाही. कुठेतरी पाणी मुरत आहे हे स्पष्ट होत आहे.
”चोराच्या उलट्या बोंबा” या म्हणीची प्रचिती देत लैला-मजनूने ग्रामशिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांना वकिलामार्फत नोटीस बजावल्याची माहिती आहे. चूक करून शिरजोर होण्याची ही कृती गावकऱ्यांच्या मनाला स्पर्श करून गेली. गावकरी पुन्हा पेटून उठले. गावकऱ्यांनी जयनगर शाळेला टाळे ठोकले आहे. गावकरी दिवसभर भर उन्हात मंडप टाकून लैला-मजनू वर कारवाई करण्याची मागणी करत आहे. पंचायत समितीमध्ये दिवसभर या प्रकरणाचे चवीने चर्वन होत आहे. या प्रकरणाची चर्चा होत असताना हास्याचे फवारे उडत आहेत. शिक्षण विभागाचे धिंडवडे उडवले जात आहेत. पण या दोघांवर कारवाई करण्याची हिम्मत मात्र संबंधित विभाग दाखवत नाही.

