प्रतिनिधी
अहेरी : अहेरी-चेरपल्ली रस्त्यावर असलेल्या पाताअहेरी या वस्तीच्या थोडे पुढे वाहणाऱ्या लक्ष्मण नाल्यावर लघु पाटबंधारे विभागाकडून सिमेंट काँक्रीटचा बंधारा बांधण्यात आला. दोन महिन्यापूर्वी या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. लगतच्या शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी. उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी असा बंधारा बांधण्यामागे हेतू असला तरी पाणी अडविण्यासाठी वापरात येणाऱ्या लोखंडी प्लेट्स या ठिकाणी लावण्यात न आल्याने बंधाऱ्याचे पाणी अडलेच नाही. शेतकऱ्यांना पाण्याची सोय झाली नाही. दुसरीकडे जनावरे तहानलेलीच आहेत. 40 लाख रुपये किमतीच्या बंधाऱ्याचे काम लक्ष्मण नाल्यावर करण्यात आले. वस्तीपासून हाकेच्या अंतरावर बंधाऱ्याचे काम आहे. 200 मीटरवर घरे आहेत. लोकांकडे मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. बंधाऱ्यालगतचा पूर्ण परिसर शेतीचा आहे. शेती असलेला परिसर, बाजूलाच घरे असल्याने मोठ्या प्रमाणात जनावरे आहेत. दोघांनाही लाभ व्हावा या हेतूने बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. हेतू चांगला असला तरी पूर्तता करण्याच्या उद्देशाने लघु पाटबंधारे विभाग सक्रिय नाही.
बंधाऱ्याला भेट दिली असता बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्याचे लक्षात आले. सध्या स्थितीत थोडेफार पाणी नाल्यात वाहत आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले असले तरी पाणी अडविण्यासाठी बंधाऱ्याच्या दोन कॉलमच्या मधोमध लोखंडी प्लेट्स टाकण्यात येतात. या प्लेट्स टाकण्यात आलेल्या नाहीत. बंधाऱ्याच्या मागे नाल्याच्या दोन्ही काठापर्यंत पाणी तुडुंब साचलेले दिसणे आवश्यक होते. नाल्याला थोडाफार प्रवाह आहे. गेल्या आठवड्यापासून कडक उन्ह तापत आहे. पाण्याचा प्रवाह लवकरच आटण्याची शक्यता आहे. पाणी आटल्यानंतर प्लेट्स लावण्यात काहीही अर्थ नाही. प्लेट लावण्यासाठी कुणाची वाट पाहिल्या जात आहे. असा प्रश्न आजूबाजूचे शेतकरी विचारत आहेत.
दर्जाबद्दल शंका
बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याचे निरीक्षण केले असता बंधाऱ्याच्या कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहे. बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला पक्का दगडाचा थर रचने आवश्यक होते. थातूरमातूर थर रचलेला दिसतो. रचलेले दगड ढासाळले. नाल्यात पडलेले दिसतात. बंधाऱ्याच्या पुढच्या भागाला सिमेंट काँक्रीट चा बेड पसरवणे आवश्यक आहे. बेड दिसतच नाही. सिमेंट काँक्रेटची पार बांधलेली आहे. पण तेथे पूर्ण रेती असल्याचे लक्षात आले. ठेकेदाराने काम योग्य पद्धतीने, निकषानुसार केले नसल्याचे लक्षात येते. लघु पाटबंधारे विभागाने कंत्राटदाराच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

