डॉ.प्रसन्न मद्दीवारांनी केले सुनीता विल्यम्सच्या प्रवासाचे विडंबन
अहेरी : लगाम पासून पुढचा प्रवास म्हणजे दिव्यच. लगाम-आलापल्ली हे 30 किलोमीटरचे अंतर पार करताना चालक आणि वाहनातील प्रवासी अक्षरशः वैतागून जातात. रस्त्याची ‘साडेसाती’ कधी संपेल यावरच चर्चा होते. पुन्हा दोन-चार वर्ष तरी ही साडेसाती जाणार नाही. प्रवासाच्या चर्चेत रस्त्याच्या दुर्दशेवर शिक्कामोर्तब होते.
व्हाट्सअप, फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर हा विषय नेहमीच फिरत असतो. प्रत्येकाची नकारात्मक चर्चा असते. सत्ताधारी असो वा विरोधक. अनेक घटनांचे कनेक्शन या रस्त्याशी जोडल्या जाते. समाज माध्यमांवर विडंबन केल्या जाते. सुनिता विल्यम्स मूळच्या भारतीय वंशाच्या. अंतराळात गेल्या. नऊ महिने अडकून पडल्या. शेवटी ड्रॅगन नामक यान त्यांच्यासाठी पाठवण्यात आले. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी विलमोर बुच दोघेही सुखरूप वातावरणात उतरले. या घटनेचे ‘कनेक्शन’ प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रसन्न मद्दीवार यांनी लगाम-आलापल्ली रस्त्याशी जोडले. यान अमेरिकेत उतरले नाही तर लगाम-आलापलीच्या रस्त्यावर उतरले. अशी उपरोधीक उपमा त्यांनी सुनीता विल्यम्सच्या प्रवासाला दिली.
डॉ.प्रसन्न मद्दीवार अहेरीचे. अहेरी त्यांचे जन्मस्थळ. आई-वडील नातेवाईक अहेरीत वास्तव्य करतात. मातृभूमीची सेवा करता यावी म्हणून महिन्यातून दोन वेळा अहेरी व आलापल्ली येथे दवाखाना चालवितात. स्थानिक रुग्णांना सेवा देतात. अहेरी व एटापल्ली उपविभागातल्या चारही तालुक्यांमध्ये त्यांचा मोठा रुग्णवर्ग आणि चाहता वर्ग आहे. दवाखाना हाच आपला हेतू नाही. मातृभूमीशी नाळ टिकवून ठेवणे हा महत्त्वाचा हेतू आहे. असे त्यांचे म्हणणे आहे. पण गेल्या आठ महिन्यापासून रस्त्याच्या अडचणीमुळे ते अहेरी येऊ शकले नाही. दोष कोणाला द्यायचा समजत नाही. मार्ग निघण्याची चिन्हे दिसत नाही. दिवसेंदिवस रस्ता खराब होतो. प्रवास करता येत नाही. अहेरीला येणे त्यांना टाळावे लागते. ते वैतागले. व्हाट्सअप, फेसबुक सारख्या माध्यमातून रस्त्याचे विडंबन करून जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. मन मोकळे करीत आहेत.
सुनीता विल्यम एका अज्ञात स्थळी सकाळी 5 वाजता यानासकट उतरली. बाहेर येताच तिला भले मोठे खड्डे दिसले.
लाल मातीची धूळ दिसली. खूप डिप्रेशन मध्ये होती. कपाळ ठोकून म्हणाली. उतारायचे होते पृथ्विवर, उतरली चंद्रावर. तेवढ्यात एक दादा आला. म्हणाला. तुम्हाला आता सुरजागड चा ट्रक घेऊन जाईल.
रस्त्याच्या या दुर्दशेला त्यांनी पालकमंत्र्यांना जबाबदार ठरविले. तुमचं यान परत जात असेल तर त्यांना पण परत घेऊन जा. असा सल्ला त्यांनी फेसबुक वर टाकलेल्या पोस्टमध्ये दिला. 21 मार्च 2025 ची ही पोस्ट आहे.
या प्रकारे त्यांनी सुनीताच्या प्रवासाचे वर्णन केले. आष्टी-आलापल्ली या रस्त्याच्या दुर्दैशेस राजकारण जबाबदार आहे. केंद्र सरकारचा रस्ता आहे. प्रत्येक जण आपले हात झटकत आहेत. सेवेच्या क्षेत्राला सुद्धा याचा फटका बसत आहे. हे प्रसन्न मद्दीवार यांच्या भावनेतून लक्षात येत आहे.

