विझलो आज जरी मी
हा माझा अंत नाही
पेटेन उद्या नव्याने
हे सामर्थ्य नाशवंत नाही
छाटले जरी पंख माझे
पुन्हा उडेन मी
अडवू शकेल मला
अजून अशी भींत नाही…
केवढा हा स्वतःवरचा आत्मविश्वास…
उगाचच जगाला यांच्या भविष्याची चिंता लागली होती…
तेव्हा…
माझ्या भविष्याची..
मला नाही जराही काळजी
उमटेल मी धरतीवरी…
चमकेन त्या गगनात मी…!
हा प्रचंड स्वतःवरचा विश्वास जीवनात सिद्ध करणारे प्रतिभावंत कवी म्हणजे अमरावतीचे…
सुरेश श्रीधर भट
(१९३२-२००३).
त्यांना बालपणी पोलीओने एका पायात अपंगत्व आले.खूप काळ घरात अडकून राहावे लागले. त्याकाळी यावर इलाज नव्हता. डॉक्टर वडिलांनी मुलाची आवड जाणून घरात संगीत ऐकायची सोय केली.वाद्य आणून दिली.भटांनी घरातील संवादिनी,बासरी.. तबला…
गाणे शिकण्यात वेळ घालवला…
पण चार भींतीत अडकणे त्यांना मान्य नव्हते.त्यांनी जिद्दीने एवढा व्यायाम केला.. पायात ताकद आणली की मित्राला सायकलवर डबलसीट घेऊन उड्डाणपूलावरुन कॉलेजला जावू लागले…
या संगीतप्रेमी घरात त्यांना कवितेचा वारसा आईकडून लाभला.
त्यांचे शिक्षणात मन नव्हते.दोन वेळा नापास होत अखेर बी.ए. झाले. काही काळ शिक्षक.. संपादक म्हणून नोकरी केली. पण शिक्षणात लक्ष नसलेल्या…नापास होणाऱ्या या कवीचे काव्यसंग्रह आज तीन विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहेत…
मराठी गझल क्षेत्रात भटांचे स्थान अढळ आहे…
‘रुपगंधा’ या पहिल्याच काव्यसंग्रहाने त्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले.
पूढे हा गंध ‘झंझावात’ झाला.*
पं.हृदयनाथ यांना फुटपाथवरच्या पुस्तकात एक गाणे सापडले.. गीतकार होते अनोळखी सुरेश भट. ते शेकडो मैल दूर राहणारे…
हृदयनाथ गाण्याच्या प्रेमात पडले. गाणे त्यांनी विनापरवानगी लगेचच संगीतबद्ध केले. देशभर हे गाणे गाजू लागले…
गाणे होते.. “मेंदीच्या पानावर..” आणि पूढे पं. हृदयनाथ आणि सुरेश भट यांची मैत्री होत या दोघांनी मराठी सुगम संगीतात इतिहास घडवला…
सुगम संगीत घरोघरी लोकप्रिय केले…
ज्यांच्या काव्यसंग्रहाची रसिक वाट बघत असायचे असे हे कवी.त्यांचा रंगच काही वेगळा.भाषा कधी लाघवी तर कधी जीवनावर परखड भाष्य करणारा एल्गार…आक्रमक…आरसा दाखवणारी.
त्यांच्या काव्यात विषण्णता.. वेदनाही होती अन् शृंगार प्रेमही.. दोन्हीला समान न्याय…
बेरका होता दिलासा,
मानभावी धीर होता
पाठ राखायास माझी
लाघवी खंजीर होता
मनस्वी कवी ही त्यांची ओळख.
गझलातही ते हेच मांडायचे.
कुणाचे उपकार नको किंवा कुणाचे मिंधेपण नको,अधिकार गाजवणे तर नकोच नको…
श्वास हा माझा
कृपा नाही कुणाची
लेखणी माझी
कुणाची भीक नाही… !! असा सज्जड इशारा देत लिहणारे हे कवी सुरेश भट.
त्यांची भटशाही लोकांना भावणारी.त्यांनी गावोगाव मोठा शिष्य वर्ग निर्माण केला. गझल प्रसाराची मोहिम राबवली. आपल्या शिष्यांना गझलचे वृत्त, मात्रा,ओळी,शेर याचे तंत्र शिकवले. त्यासाठी शेकडो पत्र लिहून मार्गदर्शन केले.यामुळेच मराठीत आज गझलचे समृद्ध दालन उपलब्ध झालेय…
भटांच्या सगळ्याच कविता.. गझल…भावगीते याचा अभ्यास प्रत्येक काळात होतच राहणार… कोमलता…प्रखरता…तीष्ण बोचरी टीका,स्वार्थ…ढोंगीपणावर प्रहार,
कधी कमालीचा विरह तर कधी तरल…उत्कट…सोज्वळ प्रेम सारेच त्यांच्या काव्यात आहे. कारण काहीही असो पण कधीकधी परिस्थितीच अशी निर्माण होते की…
इतकेच मला जाताना
सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते…!
हे पण खरे वाटते.तर पुन्हा मनाला उभारी देत म्हणतात…
“सूर्य केव्हाच अंधारला यारहो
या…नवा सूर्य आणू चला यारहो”
हा बदलाचा नारा देणारे हे कवी.
ज्यांचे सगळेच काव्यसंग्रह लोकप्रिय ठरले असे सुरेश भट हे अपवादात्मक कवी….
एकदा मनस्वी स्वभावाच्या भटांकडून खूप वाट बघूनही गाणे मिळेना. निर्मात्याचे नुकसान वाढत होते. तेव्हा समुद्राच्या काठी फिरताना पं. हृदयनाथांंनी या मित्राला लवकरच गाणे द्या म्हणून विनंती केली. तेव्हा समुद्राच्याकाठीच तत्काळ कागदावर खरडून हे गाणे त्यांनी लिहून दिले…
“सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या..” याची लोकप्रियता सारेच जाणतात.
ते आहे आजचे गाणे….
प्रतिभावंत सुरेश भट यांना
जन्मदिनी विनम्र अभिवादन…
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजुन ही वाटते मला की,
अजून ही चांद रात आहे
कळे न मी पाहते कुणाला ?
कळे न हा चेहरा कुणाचा ?
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरशात आहे !
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे !
उगीच स्वप्नात सावल्यांची
कशास केलीस आर्जवे तू ?
दिलेस का प्रेम तू कुणाला
*तुझ्याच जे अंतरात आहे ?

