संसदेत संसद सदस्य प्रश्न विचारतात. सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्रिमहोदय उत्तरे देतात. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये बहुतेक प्रश्न विकासावर आधारित असतात. मतदारसंघाचा, राज्याचा, देशाचा, विकास कसा होत आहे. कुठे होत आहे. कधी होईल. विविध अंगी प्रश्नाचे स्वरूप असते. ठाकरे गटाच्या संजय जाधव नामक संसद सदस्यांनी संसदेत प्रश्न विचारला. प्रश्न रस्ते विकासासंदर्भात असल्याने केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रश्नाचे उत्तर दिले. संभाजीनगर-पुणे असा नवीन महामार्ग तयार होणार आहे. 15000 कोटीची गुंतवणूक या महामार्गासाठी केल्या जाणार आहे. सात तासाचे अंतर फक्त दोन तासात होणार आहे. या महामार्गाची घोषणा नितीन गडकरी यांनी संसदेमध्ये केली. आनंद आहे. महाराष्ट्राच्या दोन शहरांना जोडणारा हा महामार्ग आहे. प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा. महाराष्ट्राची प्रगती झालीच पाहिजे. देशातल्या 27 घटक राज्यांमध्ये महाराष्ट्र उठून दिसायला पाहिजे. राज्याच्या प्रत्येक नागरिकांची मान प्रगतीने उंचावली पाहिजे. पण महाराष्ट्राच्या प्रगतीची सुरुवात गडचिरोली पासून झाली पाहिजे. अठराविश्वे दारिद्र्य, नक्षलवादांचा कलंक, दारिद्र्याच्या खाईत कितपत पडलेले आदिम समाज बांधव, रस्त्याचा अभाव,अनेक गावांना बारमाई रस्ते नाही. 21 व्या शतकात आहोत, पण दुर्गम भागात बस फेरीची सोय झाली नाही. मंत्री होण्यापूर्वी नितीनजी गडचिरोली जिल्ह्यात चारचाकी वाहनाने फिरले आहेत. वस्तुस्थिती माहित आहे.
पुणे, मुंबई, संभाजीनगर, सांगली,सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सगळा महाराष्ट्रच प्रगत करा. पण गडचिरोली जिल्ह्याच्या वाट्याला आलेलं रस्ते विकासाचं दुर्दैव हे मात्र आधी पुसून टाका. दहा वर्षे आधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी घोषित झाला. आर्थिक तरतूद झाली.साकोली-सिरोंचा असा हा महामार्ग आहे. आष्टी पर्यंत आला. गेल्या पाच वर्षापासून सिरोंचा पर्यंत जायला हजारो विघ्न या रस्त्यात येत आहेत. ‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ अशी अवस्था आहे.’दिन मे ढाई कोस’ काम सुरू आहे. कंत्राटदार निर्ढावले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी दलाली घेण्यात मग्न आहेत. वनसंवर्धन कायद्याच्या नावावर कुठून काय मिळू शकते ही स्वप्ने वनविभागाचे अधिकारी रंगवित आहेत.
आठवते निवडणूक लोकसभेची. प्रचारार्थ आपणगडचिरोली येथे आले होते. ‘झारीतील शुक्राचार्य’ असा वनविभागाचा उल्लेख केला. विधानसभेच्या प्रचाराला पुन्हा चार महिन्याने आले. वनविभागाच्या घरावर मोर्चे काढा, आंदोलन करा असा सल्ला आपण स्थानिक जनतेला दिला. वन विभागाच्या नकारात्मक कार्यप्रणालीमुळे जिल्ह्याचा विकास रखडला. हे स्पष्ट आहे. आपणही कबूल करता.नियमाच्या नावावर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मस्तावले आहेत. याची आपल्याला जाण आहे. पण सत्ता कुणाची आहे ? राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे. राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली वनविभाग काम करतो. विभागाचे विशेष मंत्रालय आहे. वजनी मंत्रालय आहे. मंत्री आहेत. मंत्री सुद्धा आपल्याच पक्षाशी संबंधित आहेत. या विभागाचे अधिकारी विकासात अडचणी आणत असतील तर यांना घरचा रस्ता दाखवणे सरकारचेच काम आहे. वनविभाग मिळवण्यासाठी मंत्र्यांमध्ये स्पर्धा होते. कामासाठी स्पर्धा झाली पाहिजे. कामात अडसर निर्माण करणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करताना स्पर्धा झाली पाहिजे. म्हणून म्हणावेसे वाटते नितीनजी आम्ही काय बिघडविले.
रस्ते विकासाकडे लक्ष घातले तर गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारकडून एक-दोन रस्ते गडचिरोली जिल्ह्याला मिळाले. कामाची समाधानकारक प्रगती नाही. रस्त्याचे काम मंद गतीने सुरू आहे. जनता सरकारच्या नावाने बोटे मोडीत आहे. रस्त्याचे विडंबन करते. वन विभागाच्या वनसंवर्धन कायद्याचा अडसर येतो. उत्तर-दक्षिण चारशे किलोमीटर पेक्षा जास्त लांबी असलेला जिल्हा आहे. एक दोन रस्त्यानेच संपूर्ण जिल्हा विकासाने उजळून निघणार नाही.
पाच वर्षांपूर्वी तेलंगाना सरकारने स्वखर्चाने प्राणहीता नदीवर अहेरी येथे पुलाची निर्मिती केली. परिसरातील जनतेला कागजनगर व तेथून सर्वच दिशांकडे रेल्वेने जाणे सोयीचे झाले. कागजनगर, अहेरी, आलापल्ली, एटापल्ली, जाराववंडी, पेंढरी, पाखंजूर, दहेली, राजनांदगाव, रायपुर असा जवळपास 400 ते 500 किलोमीटरचा एक नवीन महामार्ग देशाच्या नकाशावर निर्माण होऊ शकतो. हा महामार्ग दुर्गम, अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून 400 किलोमीटर गेलेला असेल. या महामार्गाची घोषणा झाली तर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासात पुन्हा भर पडेल. पुणे, संभाजीनगरची माणसे महाराष्ट्राचीच आहेत. त्यांच्या रक्तात महाराष्ट्राचे रक्त सळसळते. गडचिरोली जिल्ह्यात वास्तव्य करणारी गरीब, वंचित माणसे सुद्धा महाराष्ट्राचीच आहेत.त्यांच्याही रक्तात महाराष्ट्राचे रक्त सळसळते. म्हणून पुण्यासोबत गडचिरोलीचा विकास व्हायला पाहिजे.
आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत, नितीनजी. वीस वर्षांपूर्वीच्या लोकसभा, विधानसभा निवडणुका आठवतात. हेलिकॉप्टरचा वापर त्या काळात फार कमी व्हायचा. वरिष्ठ,कनिष्ठ नेते चारचाकी वाहनाने प्रचाराला फिरायची. आपणही आले. भामरागड, सिरोंचा, एटापल्ली,मुलचेरा,अहेरी, आलापल्ली जवळून पाहिले. कालेश्वरला अनेकदा गेले. गोदावरीवर पूल नसल्याने नावेने जाऊन दर्शन घेतले. चित्र अजूनही आपल्या डोळ्यापुढे आहे. एकूणच उत्तर आणि दक्षिण गडचिरोली जिल्ह्याची परिस्थिती आपल्याला माहित आहे.आपण विदर्भाचे आहात. नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला आणि गडचिरोलीची तुलना केली तर गडचिरोलीच्या वाट्याला अजूनही ‘साडेसातीच’ आहे. म्हणून तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. गेल्या अकरा वर्षापासून केंद्रीय व भूपृष्ठ मंत्रालय आपण अभिमानाने सांभाळत आहात. आम्हालाही गर्व आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब किंवा इतर राज्यातला मंत्री असता तर साकोली-सिरोंचा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला नसता. आपण आहात. उडवा बार गडचिरोलीच्या विकासाचा. दोन-चार राष्ट्रीय महामार्ग जाहीर करा. गडचिरोली जिल्हा 24 तासाच्या वाहतुकीला मोकळा करा.

