चामोर्शी : शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारे प्रकरण पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत जिल्हा परिषदच्या एका शाळेत उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या डोळ्या देखत लैला-मजनू शिक्षकांनी आक्षेपार्ह वर्तन केल्याचा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे.
वरील आशयाची लेखी तक्रार 31 जानेवारी 2025 ला पंचायत समितीच्या चामोर्शीकडे करण्यात आली.या तक्रारीच्या प्रती जिल्हा परिषद गडचिरोली कडे सुद्धा सादर करण्यात आल्या. यानंतर तब्बल एक महिन्याचा कालावधी लोटला तरी कोणतीही कारवाई जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आली नाही. सामान्य तक्रारीवर तात्काळ दखल घेणारे शिक्षण विभाग या तक्रारीबाबत कसे काय गप्प आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या लैला-मजनू शिक्षकांना जिल्हा परिषदेतून आणि पंचायत समिती मधून कोणाचे अभय आहे ? असा सवाल शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकरी विचारत आहे.
गेल्या एका वर्षापासून या लैला-मजनू शिक्षकांचा आक्षेपार्ह प्रकार शाळेत सुरू आहे. आमचे आदर्श आणि प्रेरणास्थान शिक्षक काय करतात हे डोकावून पाहणाऱ्या शिष्यांना चोप देण्याचा अघोरी प्रकार या शिक्षकांनी केला. प्रश्नाचे उत्तर विद्यार्थ्यांना देता आले नाही, गृहपाठ केला नाही, विनाकारण शाळेला दांडी मारली अशा विविध कारणास्तव विद्यार्थ्यांना चोप दिला हे समजता येऊ शकते. तक्रारकर्ते गाव बंगाली भाषिक आहे. बंगाली समुदाय शिक्षणाप्रती जागरूक आहे. यामुळे या समुदायाने शिक्षण विकास प्रक्रियेत नक्कीच आपलें योगदान दिले असते. पण या लैला-मजनूच्या प्रतापामुळे संपूर्ण गाव चिडले आहे. या लैला-मजनू वर कारवाई व्हावी यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सक्रिय असताना पंचायत समिती च्या मोर्चेचा अधिकारी वर्ग मात्र वेळकाढू धोरण अवलंबित आहे.
गेल्या एक वर्षापासून या लैला-मजनूचा प्रकार सर्रास सुरू आहे. आपण ज्या शासकीय संस्थेत नोकरी करतो ती संस्था आदर्श संस्कार घडवणारी संस्था आहे. याचे भान मात्र लैला-मजनू ची जोडी विसरली. आम्हाला उत्कृष्ट आणि कुशल विद्यार्थी घडवून या देशाच्या निर्मिती महत्त्वाचे योगदान द्यायचे आहे ही बाब ही वयस्कर लैला-मजनू विसरली. प्रेमात आकंठ बुडालेले हे लैला-मजनू कुणालाच ऐकायला तयार नव्हते आणि यांचे गैरप्रकार सर्रास शाळेत सुरू होते. बालमन कोवळे असते. शाळेत घडलेल्या प्रत्येक घडामोडी विद्यार्थी आपल्या घरी सांगतात.येथेही असेच झाले. विद्यार्थ्यांनी या लैला-मजनूची सत्यकथा आपापल्या पालकांनी सांगितली. पालकांनी समज दिला. मात्र हे लैला-मजनू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.परत तोच प्रकार सर्रासपणे सुरू होता.शेवटी गावकऱ्यांनी लेखी तक्रार केली. संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी समिती गठित केली. तीन दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.त्यांच्या या निर्देशाला चौकशी समितीने केराच्या टोपलीत टाकले. पंधरवाडा संपला तरी चौकशी अहवाल देण्यात आला नाही. आणि संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी विचारणा सुद्धा केली नाही. यामुळे या प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत असल्याचे लक्षात येत आहे, आपल्या बचावासाठी या लैला-मजनूने पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांशी ‘अर्थपूर्ण’ व्यवहार केला असावा अशी शक्यता आहे.
