प्रतिनिधी
अहेरी : 2025 ला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची निवडणूक होऊ घातली आहे. सर्वसाधारण गटातून बचाव पॅनलचे उमेदवार म्हणून लक्ष्मण राजमल्लू गद्देवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सोसायटी बचाओ पॅनलचे नेतृत्व करतात. प्रयोगशील शिक्षक म्हणून ते परिचित आहेत. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा देवलमरीच्या प्रभावावर आहेत. एज्युकेशन टीव्ही नावाचे यूट्यूब चैनल चालवतात. संविधान चर्चा, स्पर्धा परीक्षा व व्यावसायिक शिक्षण असे विविध उपक्रम त्यांनी शाळेत राबविले आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी बातचीत केली असता या वेळेस त्यांनी अनेक विषयांना हात घातला.
प्रश्न : सोसायटी बचाव पॅनल या नावाबद्दल तुमचे काय मत आहे.
उत्तर : 2016 च्या निवडणुकीत सुद्धा सोसायटी बचाव पॅनल नाव होते. यावेळेसही आम्ही सोसायटी बचाव पॅनल हेच नाव वापरले आहे. 2016 च्या पूर्वी पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहार अजूनही पूर्णपणे बाहेर आलेला नाही. या व्यवहारातून सोसायटीला बाहेर काढायचे आहे. म्हणून आम्ही पुन्हा सोसायटी बचाव पॅनल हेच बॅनर वापरले आहे.
प्रश्न : गैरव्यवहाराचे नेमके स्वरूप काय आहे.
उत्तर : 2006 ते 2011 या पाच वर्षाच्या कालावधीत प्रचंड आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. शिक्षकांच्या घामाचा आणि कष्टाचा पैसा असताना वैयक्तिक नावावर तो वळता करण्यात आला. चार मुदत ठेवी असताना पुन्हा चार खोट्या मुदत ठेवी तयार करण्यात आल्या. हा गैरव्यवहार आम्ही बाहेर काढला. ज्यांनी हा गैरव्यवहार केला त्यांनी सदर रक्कम पतसंस्थेला जमा केली पण अजूनही पूर्णपणे गैरव्यवहार बाहेर आला नाही तो बाहेर काढण्यासाठीच पॅनेलला सोसायटी बचाव पॅनल असे नाव देण्यात आले. त्याच पॅनल अंतर्गत आम्ही पुन्हा निवडणुका लढवित आहोत. गैरव्यवहार करणारा तो संचालक कोण हे मात्र सांगण्यास त्यांनी टाळले.
प्रश्न : भविष्यातल्या योजना काय आहेत.
उत्तर : संस्थेचे पूर्णपणे अंकीकृतकरण आणि संगणकीकरण करण्यावर आमचा भर आहे. संगणकाच्या माध्यमातून पतसंस्थेची प्रत्येक माहिती सभासदांपर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहे. पुढील पाच वर्षाचा कार्यकाळ आम्हाला निश्चित मिळणार आहे त्यात हे काम आम्ही पूर्ण करू.
प्रश्न : संस्थेचे खटले कोर्टात चालतात कसे वाटते.
उत्तर : संस्थेची बाब न्यायालयात नेताना फार दुःख होते पण पर्याय नसतो. सामंजस्याने प्रश्न सुटत नाही. संस्थेचे हित लक्षात घेऊन कोर्टात जावे लागते.
प्रश्न : किती उमेदवार निवडून येतील.
उत्तर : पूर्णच उमेदवार निवडून येतील. एकही उमेदवार पडणार नाही. एकतर्फी सत्ता हस्तगत करू. प्रचारादरम्यान पतसंस्थेच्या मतदारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. एकतर्फी निर्णय लागल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
प्रश्न : समता पॅनलचा अध्यक्ष निश्चित झाला नाही काय मत आहे.
उत्तर : या पॅनल मध्ये अध्यक्ष पदाचे दावेदार अनेक आहेत. एकापेक्षा जास्त दावेदार असले तर गोंधळ होतोच. अध्यक्षपदासाठी या पॅनलमध्ये प्रचंड गोंधळ आहे. या पॅनल मध्ये प्रामाणिक माणसांचा अभाव असल्याचे लक्षात येत आहे असा आरोप त्यांनी या वेळेस केला.
प्रश्न : तुम्ही कोणते पद घ्याल.
उत्तर : मला कोणतेही पद नको. नेतृत्व करत असलो तरी अजून पर्यंत मी कोणत्याही पदावर दावा केला नाही. अध्यक्षपदासाठी महेश मडावी यांचे नाव पुढे केले. सचिव पदासाठी आम्ही चांगला व प्रामाणिक माणूसच देऊ.
लक्ष्मण गद्देवार सोसायटी बचाव पॅनलचे नेतृत्व करतात. या निवडणुकीत ते जोमाने कामाला लागले आहेत. सोसायटी बचाओ पॅनलच्या प्रचाराची धुरा त्यांच्या खांद्यावर आहे. 13 पैकी 13 संचालक निवडून येतील असा त्यांचा आत्मविश्वास आहे.
