पतसंस्था निवडणूक
अहेरी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित अहेरी नोंदणी क्रमांक 186 चा पसारा खूप मोठा आहे. अहेरी तालुक्यात या पतसंस्थेचे सभासद मोठ्या प्रमाणावर असले तरी काही सभासद जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये विखूरले आहेत. पूर्वी पंचायत समिती अहेरी येथे कार्यरत होते आणि कालांतराने त्यांचे स्थानांतरण अन्य पंचायत समितीमध्ये झाले. यापैकी काही सभासद या पतसंस्थेचे ऋणधारक आहे तर काही सभासदांनी सदस्यत्व सोडले नाही. यामुळे या सभासदांना सुद्धा मतदानाचा अधिकार आहे. या सभासदांची भूमिका निर्णायक राहणार आहे.
पंचायत समिती अहेरी येथे जवळपास 200 सभासद आहेत. एटापल्ली येथे 106 सभासद असल्याचे सांगण्यात येत आहे. पंचायत समिती भामरागड मध्ये 34 सभासद असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरी या पतसंस्थेचे मुख्य कार्य अहेरी एटापल्ली व भामरागड तालुक्यासाठी आहे. या तीन पंचायत समितीमध्ये कार्यरत व इच्छुक असलेल्या शिक्षकांना या पतसंस्थेचा सभासद होता येते. मात्र जिल्हा परिषद अंतर्गत झालेल्या स्थानांतरणामध्ये बदलून गेल्यानंतर सुद्धा या सभासदांचे सदस्यत्व कायम राहते. यांचे सभासदत्व संपविण्याचा कोणताही नियम नाही. यामुळे जिल्ह्याच्या अन्य 9 तालुक्यांमध्ये पतसंस्थेचे सभासद विखुरले आहेत. आष्टी येथे 15 च्या संख्येने सभासद आहेत. कुरखेडा, कोरची, आरमोरी, गडचिरोली, देसाईगंज, मुलचेरा अशा विविध पंचायत समित्यांमध्ये असलेल्या सभासदांची संख्या 50 च्या वर जाते. पतसंस्थेमध्ये एकूण 418 मतदार आहेत. या 418 मतदारांना 13 संचालकांना निवडून द्यायचे आहे. 80 ते 100 च्या जवळपास पडलेली मते निर्णायक मते असतील. अशा परिस्थितीमध्ये 50 मतदार सामान्य मतदार नाही. मागील निवडणुकीत दोन उमेदवारांना सारखेच मते पडली. शेवटी ईश्वर चिट्ठी काढून निर्णय लावण्यात आला. अशा परिस्थितीत या निवडणुकी च्या रणमैदानात दंड थोपाटून एकमेकांविरोधात उभे असलेले दोन्ही पॅनल कोणतीही जोखीम स्वीकारतील असे वाटत नाही. या 50 सदस्यांना कुठल्याही परिस्थितीत अहेरी येथे आणल्या जाईल. त्यांना मतदान करायला लावल्या जाईल आणि आपल्या विजयाच्या वाट्यात त्यांचा मोलाचा वाटा टाकल्या जाईल असे चित्र आज तरी दिसत आहे.
