अहेरी : पूर्वी फक्त उन्हाळ्यातच शीतपेय विकल्या जायची. मात्र आता वर्षभरही शीतपेय, आईस्क्रीम, पाणी विकल्या जाते. यात विकल्या जाणाऱ्या शीतपेयावर कुलिंग चार्जेस च्या नावाखाली पाच रुपये अतिरिक्त आकारले जात आहे. परिसरातील शीतपेय विक्रेत्याकडून सदरचा प्रकार सुरू आहे. यात जनतेला पाच रुपयाचा अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागत आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार शीतपेयाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागातील खेड्यापाड्यापर्यंत वाहनांद्वारे शीतपेयाचा पुरवठा केला जातो. विविध कंपन्यांच्या शीतपेयाच्या एजन्सीज स्थानिक परिसरात तयार झाले असल्याने पुरवठा केल्या जात आहे.
साधारणता लहान थम्सअप, माझा, पेप्सी यांची किंमत वीस रुपये आहे. शीतपेयाची किंमत शीतपेयाच्या बॉटलवर मुद्रित असते. असे असले तरी कुलिंग चार्जेस च्या नावावर तब्बल पाच रुपये अतिरिक्त आकारल्या जात आहे. सगळेच शीतपेय विक्रेते या पद्धतीने शीतपेयाची विक्री करीत आहेत. एक लिटर किंवा दोन लिटर ची मोठी बॉटल खरेदी केली तर पाच रुपये अतिरिक्त देणे ग्राहकांना परवडण्यासारखे आहे. मात्र वीस रुपयाच्या बॉटलवर पाच रुपये अतिरिक्त देणे ग्राहकांच्या जिव्हारी लागत आहे. पण पर्याय नाही.
शीतपेयाची विक्री किराणा दुकानापासून तर लहान मोठ्या दुकानांमध्ये केली जाते. यामुळे या विक्रीवर नियंत्रण ठेवणे सुद्धा कठीण आहे. गल्लीबोळातील दुकाने सहजपणे एखादा लहान फ्रीज आणून शीतपेय विकू शकतात. शीतपेय विक्रेत्यांची संख्या अमर्याद स्वरूपाची असल्यामुळे कुलिंग चार्जेसच्या नावावर ग्राहकांना होत असलेला अतिरिक्त भुर्दंड थांबवणे सध्या तरी कठीण दिसत आहे.
कमिशन कमी
कुलिंग चार्जेसचा मुद्दा कमिशन मधून निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. शीतपेय तयार करणाऱ्या कंपन्या शीतपेय विक्रेत्यांना कमिशन कमी देतात. शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत शीतपेय ही वस्तू गरजेची झाली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मागणी होते. बाजारपेठ खूप मोठी आहे. ग्राहकांच्या मागणीचा पुरवठा करायचा आहे. विजेचे बिल सुद्धा मोठ्या प्रमाणात येते. यामुळे कुलिंग चार्जेस घेण्याशिवाय पर्याय नाही असा युक्तिवाद शीतपेय विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे.
मोठे कमिशन
गेल्या काही वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा खूप मोठा व्यवसाय भारतात विकसित झाला आहे. 200 ml पासून चार पाच मीटर पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या बॉटल विकत मिळतात. 1000 मिली लिटर ची बॉटल 20 रुपयात मिळते. वस्तुस्थितीत ही बॉटल विक्रेत्यांना फक्त आठ रुपये पन्नास पैशात मिळते. एका बॉटलवर तब्बल साडेअकरा रुपये कमिशन स्वरूपात मिळतात. यात विक्रेत्यांना त्यांना मोठा फायदा असतो.
