मोसम पुलाच्या कामातला प्रकार
अहेरी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी आल्लापल्ली-सिरोंचा दरम्यान मोसम येथे कंत्राटदराने लहान पुलाच्या कामासाठी वळण रस्ता तयार केला. दोन महिन्यापूर्वी वळण रस्ता केला असला तरी पुलाच्या बांधकामास अद्याप सुरुवात करण्यात आली नाही. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी या रस्त्यावर कंत्राटदार धर-सोड पद्धतीने काम करीत असल्याने जनता त्रस्त आहे.
आल्लापल्ली-सिरोंचा मार्गावर मोसम गाव आहे. गावाला लागून एक छोटा नाला आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामादरम्यान येणाऱ्या सर्व लहान-मोठ्या पुलांचे बांधकाम सुरू आहे. या रस्त्यावर विविध पुलांचे बांधकाम हाती घेण्यात आले. काही पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.तर काही पुलांकडे कंत्राटदार हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याचे लक्षात येत आहे.
मोसमदरम्यान असलेल्या नाल्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी कंत्राट दाराकडून दोन महिन्यापूर्वी बाजूने वळण रस्ता तयार करण्यात आला. वळण रस्ता तयार करण्यात आला असला तरी जुना पूल पाडलेला नाही. नवीन वळण रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली नाही. जुन्या पुलाला जागोजागी खड्डे पडले आहे. या ठिकाणी वाहनधारकांना अत्यंत कमी वेगाने दुचाकी किंवा चारचाकी चालवावी लागते.
पावसाळ्या दरम्यान या पुलाला मोठ्या प्रमाणात पाणी असते. अनेकदा पुलाच्या वरून पाणी वाहते. पाच वर्षा आधी एस.टी. चालकाने पावसात पाण्यातून एस.टी. टाकली असता एस.टी.वाहत गेली होती. नाल्यात असलेल्या एका मोठ्या झाडाला एस.टी.अडकली होती. गावकऱ्यांनी आणि पुरामुळे अडकलेल्या प्रवाशांनी दोराचा वापर करून अडकलेल्या प्रवाशांना वाचविले होते. येत्या 15-20 दिवसात या पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले नाही. मे-जून मध्ये पुलाचे बांधकाम सुरू केले तर या पुलावरून होणारी वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वाहतूक प्रभावित होण्याची शक्यता असताना सुद्धा कंत्राटदाराकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कंत्राटदार रस्ता तयार करतात की जनतेला त्रास देण्याचे काम करतात अशी उपरोधिक प्रतिक्रिया जनता व्यक्त करीत आहे.

