अहेरी : 2024 ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवडणूक चिन्हावर लढलेले संदीप कोरेत आता शिंदे सेना वासी झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या नागपूर येथील एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संदीप कोरेत यांनी धनुष्यबाण हाती घेतला.
विधानसभा निवडणूक आटोपून दोन ते अडीच महिन्याचा कालावधी लोटताच त्यांनी शिंदे प्रवेश केला. ध्यानीमनी नसताना त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीची मोठी जबाबदारी संदीप कोरेत यांच्यावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते म्हणून संदीप कोरत यांची ओळख आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यापासून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दस सुरुवात केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्तृत्वाला बहर येईल असे त्यांना वाटत होते. म्हणून 2024 च्या विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्ष आपल्याला विधानसभेचे तिकीट देईल असे त्यांना वाटायचे. निवडणुकीच्या दोन वर्षापासून तसे त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहे. फार वाव देत नाही. तीन राजकीय पक्षाची युती असल्याने तिकीट कोणाच्या वाट्याला जाईल. शाश्वती नाही. हे लक्षात येताच संदीप कोरेत यांनी शेवटच्या क्षणी मनसेचे इंजिन पकडले. मुंबई येथे जाऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. तिकीट मिळवले. निवडणूक लढविली. मात्र फार मते गोळा करता आली नाही. अहेरी विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्य फारसे प्रभावी नसल्याने स्वबळावरच त्यांना मते गोळा करावी लागली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राहून आपण आपल्या राजकीय व्यक्तिमत्त्वाचा विकास करू शकत नाही. विद्यमान सत्ताधारी पक्षाला पकडल्याशिवाय पर्याय नाही. ही बाब लक्षात येताच त्यांनी शिंदे सेनेचा पर्याय स्वीकारला. नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला संदीप कोरेत उपस्थित होते. या कार्यक्रमात संदीप कोरेत यांनी पक्षप्रवेश केला.
अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पार्श्वभूमीवर संदीप कोरेत यांचा शिंदे सेनेतील प्रवेश महत्त्वपूर्ण समजल्या जात आहे. राज्यात शिंदे सेना सत्तेत असली तरी अहेरी विधानसभा मतदारसंघात जबाबदारी सांभाळणारे व्यक्तिमत्व या पक्षाकडे नव्हते. संदीप कोरेत यांच्याकडे अहेरी मतदारसंघाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्याची सुद्धा अतिरिक्त जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
