बौद्ध समाज मंडळआलापल्लीची मागणी
अहेरी : चामोर्शी तालुक्याच्या सोमनपल्ली बस थांब्यावर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याचे दि. 21 फेब्रुवारी 2025 ला उघडकीस आले.
गडचिरोली व परिसरातील जिल्ह्याच्या बौद्ध समाजामध्ये संतापाची लाट उसळली. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पोलीस स्टेशन आष्टी वर धडक देत आरोपीस तात्काळ जेरबंद करण्याचे मागणी केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी दहा पोलीस पथके गठित करून आरोपीचा शोध सुरू केला. प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सुमित मंडल नामक युवकाला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता आपणच हे कृत्य केल्याचे सुमित मंडल याने कबूल केले. सुमित मंडल हा मानसिक दृष्ट्या कमजोर असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याच्या मानसिकतेची खात्री तज्ञ मानसोपचार तज्ञाकडून करण्यात यावी. सोबतच या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे एका निवेदनात करण्यात आली आहे. महसूल विभाग अहेरी च्या वतीने सदर निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी च्या आष्टी- चामोर्शी दरम्यान आष्टी पासून 15 किलोमीटर अंतरावर सोमणपल्ली बस थांबा आहे. सदर बस थांबा जंगलात आहे. येथून गाव दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे. बस थांब्यात कधी प्रवासी असतात तर कधी नसतात. याचा फायदा घेत सुमित मंडलेने राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपर्ह लिखाण केले. सामाजिक दृष्टीने शांत असलेल्या परिसरात घडलेली ही घटना निंदनीय होती. आंबेडकरी विचारांना मानणाऱ्या अनुयायांनी पोलिसांकडे आपल्या भावना नोंदविल्या. त्याच तीव्रतेने पोलिसांनी या घटनेचा तपास केला. सुमित मंडल याला अटक केली. या प्रकरणात सुमित मंडल याला अन्य कुणाचा आशीर्वाद आहे का ही खात्री सुद्धा पोलिसांनी करावी. सुमित मंडल खरच मानसिक दृष्ट्या कमजोर आहे का याबाबत स्थानिक डॉक्टरांचे मत घेण्यापेक्षा नागपूर येथील मानसोपचार तज्ञाचे मत घ्यावे. प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करावा. सदर प्रकरण जलद गती न्यायालयात सादर करून आरोपींना तात्काळ शिक्षा द्यावी अशी मागणी बौद्ध समाज मंडळाला आलापल्लीच्या वतीने करण्यात आली.
