अहेरी : शहरी परिसर आणि ग्रामीण परिसर या दोन्ही परिसरातील जीवन पद्धतीमध्ये केल्या वीस-पंचवीस वर्षात जमीन-अस्मानचा फरक पडला आहे. शहरी लोकांना ‘रेडीमेड’ ची सवय पडली. ग्रामीण भागातील जनता अन्नधान्य, कडधान्याच्या बाबतीत पारंपारिक पद्धतीनेच काम करीत आहे. दुर्गम, अतिदुर्गम, आदिवासी बहुल भागातील परिस्थिती अजूनही वेगळी आहे. अहेरी, एटापल्ली, भामरागड, सिरोंचासारख्या दुर्गम भागात अन्नधान्य, कडधान्य साठवणुकीसाठी ‘ढोली’ या साधनाचा अजूनही वापर होतो. शेतात निघालेले अन्नधान्य, कडधान्य ढोलीमध्ये साठवून ठेवल्या जाते. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात कडक ऊन असते. या उन्हात धान्य वाळविल्या जाते. आणि पुन्हा साठवणूक करून ठेवल्या जाते. यावर्षी उन्हाळ्यात कडक उन्ह तापत आहे. या उन्हात अन्नधान्य, कडधान्य वाळवणीचे काम ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात होत आहे. यातून
स्थानिक परिसरातील दुर्गम व अति दुर्गम गावांमध्ये ग्रामीण जीवनशैलीचा परिचय मिळत आहे. परिसरात मोठा जंगल असला तरी गावाच्या आजूबाजूला थोडीफार शेती असते. या शेतीतून स्थानिक आदिवासी व गैर आदिवासी नागरिक अन्नधान्य व कडधान्याचे उत्पन्न घेतो. अन्नधान्य हाती आल्यानंतर साठवणुकी करता ढोली या साधनाचा वापर होत आहे. शहरी जीवनशैली बदलली असली तरी अहेरी,भामरागड, सिरोंचा, एटापल्ली या तालुक्यामध्ये बांबू पासून बनविण्यात आलेल्या ढोलीचा वापर होतो. ढोली मध्ये अन्नधान्य साठवून ठेवल्या जात असते. सोबत कडधान्यही असते. एप्रिल महिन्यात यावर्षी कडक उन्हाला सुरुवात झाली. साठविण्यात आलेले कडधान्य स्त्रियांनी बाहेर काढले. घरासमोर वाढवायला घातले. वाळवून सुस्थितीत राहावे हा यामागचा हेतू आहे.
प्रस्तुत प्रतिनिधीनी अहेरी तालुक्याच्या सिंदा या गावाला भेट दिली असता गावातील स्त्रिया वाळवणीच्या लगबगीत दिसल्या. मुंग, मोठ, बरबटी, वालाच्या शेंगाचे दाणे इत्यादी कडधान्य वाढविण्याच्या कामात स्त्रिया गुंतल्या होत्या. कडधान्यांना कीड लागू नये म्हणून चुलीतली पांढरी राख त्यात मिसळवत असल्याचे लक्षात आले. कडधान्यात राख मिसळल्याने कीड लागत नाही असे स्त्रियांनी सांगितले.
काही स्त्रिया धानाला वाळविण्याचे काम करीत होत्या. उन्हाळ्याच्या दिवसात धान उत्तम प्रकारे वाळले तर त्यापासून मिळणारा तांदूळ सुद्धा दर्जेदार असतो. खायला रुचकर लागतो. यामुळे बऱ्याच स्त्रिया धानाला वाढविण्याच्या कामात गुंतल्या.
एकंदरीत शहरात ‘मॉल’ संस्कृती विकसित झाली आहे. पाच दहा रुपयाच्या पाकिट पासून तर मोठ्या पॉकेट पर्यंत अन्नधान्य कडधान्य विकत मिळते. घरातील सगळेच लहान-मोठ्या नोकरीवर असतात. अन्नधान्य, कडधान्य निवडण्यासाठी कोणाकडेच वेळ नसतो. अशा स्थितीत रेडीमेडवर शहरातील जनतेचा भर असतो. धावपळीत शहरी जनतेच्या वाट्याला रेडीमेड येत असले तरी ग्रामीण भागात गावठी आणि अस्सल कडधान्य खाण्याचे सौभाग्य जनतेला मिळत आहे.

