अहेरी: : हसन बाग हॉटेल लगत गाव माझा उद्योग फाउंडेशन प्रकल्पाचा शुभारंभ सोमवार 31 मार्च 2025 ला अहेरी नगर पंचायती अहेरीच्या नगर सेविका तथा सभापती नौरास शेख यांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षस्थानी गाव माझा उद्योग फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक राजकपूर भडके होते. मंचावर उदघाटक म्हणून नगरसेविका नौरास शेख होते, प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, कांता भडके, आम्रपाली कोसंकर, संजना नेवारे, दीपमाला झाडे उपस्थित होते.
नगर सेविका नौरास शेख यांच्या हस्ते फित कापून प्रकल्पाचे विधिवत शुभारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलीत व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून गाव माझा फाऊंडेशनचे महाव्यवस्थापक राजकपुर भडके यांनी, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि महिलांचे हात बळकट करण्यासाठी गाव माझा उद्योग फाउंडेशन सदैव तत्पर असून शासनाचे ‘लखपती दीदी’ या अभिनव उपक्रमातून महिलाना लखपती करण्याचे लक्ष्य व उद्देश असल्याचे आवर्जून सांगून या प्रकल्पात संसारोपयोगी व जीवनावश्यक साहित्य स्वस्त व माफक दरात मिळणार असल्याचे व याचा लाभ प्रत्येकानी घेण्याचे आवाहन राजकपूर भडके यांनी केले.
याचवेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोणे, रियाज शेख यांनी ‘गाव माझा उद्योग फाउंडेशन’ हे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व उन्नतीसाठी धडपड करीत असल्याने या माध्यमातून अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील महिला व्यवसाय व उद्योगाच्या क्षेत्रातून विकासाची उत्तुंग झेप घेतील असा आशावाद व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांता भडके यांनी तर सूत्रसंचालन प्रांजली मेकर्तीवार, रुपाली जाकेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तनवी उराडे यांनी मानले. यावेळी अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील बहुसंख्य महिला भगिनी उपस्थित होते.

