नगरपंचायत उदासीन
अहेरी : कुठलेही शासकीय वाहन नादुरुस्त असेल तर ते दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये असायला पाहिजे. शासकीय वाहन असेल तर त्याची कधीही गरज पडू शकते. रुग्णवाहिका, शववाहिका ही वाहने अत्यावश्यक सेवेत मोडतात. शासनाकडून नगरपंचायत अहेरीला ‘स्वर्गरथ’ या नावाने शववाहीका देण्यात आली आहे. 20 दिवसापूर्वी सुरू असलेली शववाहिका सध्या स्थितीत बंद आहे. अंतिम संस्काराच्या वेळेस शववाहिका उपलब्ध होत नसल्याने खाजगी वाहन भाड्याने घ्यावे लागते. खाजगी वाहनधारक अतिरिक्त रक्कम घेऊन शव अंतिम संस्काराच्या ठिकाणापर्यंत पोहोचवत असल्याने आर्थिक भुर्दंड अंतिम संस्कार असलेल्या घरच्यांना सोसावा लागत आहे. दुःखद प्रसंगी आर्थिक भुर्दंडाचे अतिरिक्त दुःख सहन करावे लागत आहे.
20 दिवसापासून शववाहीका नादुरुस्त असली तरी शवावाहिकेला दुरुस्त करण्याचा कोणताही प्रयत्न नगरपंचायत अहेरीकडून झाला नाही. शववाहिका नगरपंचायतच्या आवारात उभी आहे. ही शववाहिका कधी दुरुस्त करण्यात येईल असा प्रश्न आता जनतेस पडला आहे.
अहेरी येथे निधन झालेल्या व्यक्तींचा अंतिम संस्कार चिंचगुंडी स्थित प्राणहिता नदी घाटावर करण्यात येतो. बौद्ध समाज बांधव आल्लापल्ली रोड स्थित असलेल्या स्मशानभूमीत नेतात. काही समाज बांधव आपापल्या सोयीने वेगवेगळ्या ठिकाणी अंतिम संस्कार आटोपतात. स्मशानभूमी किंवा नदी घाट 2 ते 4 किलोमीटर अंतराच्या जवळपास आहे. मोठे अंतर असल्याने निधन झालेल्या व्यक्तीला घरापासून काही अंतरापर्यंत आणले जाते. त्यानंतर शववाहिके मध्ये ठेवून नदीघाट किंवा स्मशानभूमीपर्यंत पोहोचविल्या जाते.
अंतराची अडचण लक्षात घेऊन 15 वर्षांपूर्वी काही अहेरीकरांनी पुढाकार घेतला. दानातून शववाहीका विकत घेण्यात आली होती. ही शववाहीका धर्मदाय तत्त्वावर चालविण्यात आली होती. याचा लाभ अनेक कुटुंबीयांनी घेतला. बऱ्याच दूर अंतरापर्यंत या शववाहीकेने सेवा दिली. कालसापेक्ष ही शववाहीका कालबाह्य झाली. नगरपंचायतची निर्मिती झाल्यावर काही वर्षाने शासनाकडून शववाहिका मिळाली. गेल्या पंधरा दिवसापर्यंत ही शववाहीका अंतिम संस्काराला सेवा देत होती. कोणतेही शुल्क न आकारता शववाहीकीची सेवा मिळत असल्याने अनेक कुटुंबांना अंतिम संस्कार प्रसंगी मोलाचे सहकार्य मिळत होते. दिलासा मिळायचा. नगरपंचायत अहेरी अर्थात शासनाचा हा स्तुत्य उपक्रम होता.
20 दिवसापूर्वी शववाहिकेमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला. शववाहीका नगरपंचायत अहेरीच्या गेट समोर उभी राहिली. तब्बल 20 दिवसापासून या गेट समोरच शववाहीका उभी आहे. स्थानिक पातळीवर चारचाकी वाहन दुरुस्तीचे दुकाने उपलब्ध असताना शववाहीका नगरपंचायत समोर उभी का आहे ? याचे कारण अद्याप कुणालाच समजले नाही. शवावाहीका दुरुस्तीसाठी लागणारा निधी नगरपंचायतकडे नसावा ? याच कारणास्तव ही शववाहीका उभी असावी असा अंदाज शववाहीका नादुरुस्त आहे ही बाब माहीत असणारे लावत आहे. या व्यतिरिक्त दुसरे कारण असण्याची शक्यता नाही.
वातानुकूलित शववाहिका उपजिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरित
एक महिन्यापूर्वी शासनाकडून वातानुकूलित शववाहीका नगरपंचायत अहेरीला मिळाली. या शववाहिकेला अहेरी येथे वापरण्याची परवानगी नाही. अहेरी सोडून अन्य गावामध्ये शव पोहोचविता येते. या शववाहिकेचा वापर अहेरी येथे करता येत नाही. अशी या शववाहिकेबाबत माहिती आहे. मिळालेल्या या शववाहीकेच्या निकषाची कल्पना नगरपंचायतलाच आहे. वातानुकूलित वाहन असल्याने शव वाहिकेचा आवरेज प्रति लिटर फक्त 5 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. असे वाहन पोसणे शक्य नाही. मोठे डिझेल लागेल. अडचणीचे ठरू शकते. यामुळे नगरपंचायतने यातून पळ काढला. वातानुकूलित शववाहीका उपजिल्हा रुग्णालय अहेरीकडे हस्तांतरित करून हात वर केले अशी माहिती आहे. शासनाचे वाहन, शासनाच्या योजना जनतेसाठी राबवायच्या असताना शासकीय कार्यालय असे का करतात हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.
आर्थिक भुर्दंड
शवावाहीका उपलब्ध नसल्याने अंतिम संस्कार असलेल्या घरच्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. मृत्यू संदर्भात अजूनही परिपक्व मानसिकता तयार झालेली नाही. मृत्यूसाठी वाहन देणे नाकारतात. बोटावर मोजण्याइतके एक-दोन व्यक्ती अंत्यसंस्कारसाठी वाहन देण्यासाठी तयार होतात. दोन ते चार किलोमीटरसाठी 1700 ते 2000 रुपये आकारले जातात. पर्याय नसल्याने अर्धा तासाचे दोन हजार रुपये मोजावे लागत आहे. आर्थिक अवस्था तोलामोलाची असलेल्या कुटुंबीयांना हा खर्च आवाक्याबाहेर आहे.
शववाहीका पंधरा दिवसापासून नादुरुस्त असली तरी अजून कोणत्याच राजकीय व सामाजिक कार्यकर्त्याचे किंवा पदाधिकाऱ्याचे याकडे लक्ष गेले नाही. अहेरीत विविध राजकीय आणि सामाजिक संघटना सक्रिय आहेत. कुणाकडूनच दोन ओळीचे पत्र मुख्याधिकारी, नगरपंचायत अहेरीला अद्याप देण्यात आलेले नाही. या समस्येची दखल कुणीच घेतली नसल्याने तूर्तास उकल होण्याची शक्यता सुद्धा दिसत नाही.

