‘साडेसाती’ संपणार
अहेरी : बसेस अभावी जर्जर झालेल्या अहेरी आगाराला नवसंजीवनी मिळाली आहे. बांधणीसाठी प्रसिद्ध असलेल्या अशोक लेलँडच्या पाच नवीन बसेस अहेरी आगाराला मिळाल्या. मागील महिन्यात मानव विकास मिशनच्या 25 बसेस प्राप्त झाल्या. एकूण 30 बसेस प्राप्त झाले असल्याने गेल्या काही वर्षापासून अहेरी आघाडीची बिघडलेली वाहतूक व्यवस्था रुळावर येण्याचा अंदाज दिसत आहे.
एकेकाळी उत्पन्नासाठी राज्यात प्रसिद्ध असलेले अहेरी आगार गेल्या काही वर्षापासून प्रचंड माघारले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 च्या दुराव्यवस्थेमुळे तर अहेरी आगाराची व्यवस्थाच विस्कळीत झाली. रोजच्या 25 ते 30 बसेस देखभाल व दुरुस्तीसाठी आगारात उभ्या असतात. मानव विकास मिशनच्या माध्यमातून 25 वर्षांपूर्वी प्राप्त झालेल्या बसेस पूर्णपणे मोडकळीस आल्या आहे. ‘ठिगळ’ लावून अहेरी आगाराचा गाडा हाकलण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मानव विकास मिशन कडून गेल्या महिन्यात 25 बसेस प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या ह्या सर्व बसेस ग्रामीण भागात चालवायच्या आहेत. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाचा टक्का वाढावा म्हणून मानव विकास आयुक्त औरंगाबाद कडून या बसेस देण्यात येतात. ह्या बसेस मुलींसाठी असल्या तरी अहेरी आगार 90% या बसेस चा वापर व्यावसायिकदृष्ट्या करीत आहे. चंद्रपूर, गडचिरोली या जलद फेऱ्या या बसेसच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. सर्रास पांढरे बोर्ड बसेस वर लावण्यात येत आहेत.
पांढरे बोर्ड लावून मानव विकास मिशनच्या निळ्या बसेस चंद्रपूर, गडचिरोली चालविण्यात येत असल्या तरी लांब पल्ल्याच्या बसेस मात्र बंद आहेत. यवतमाळ, अमरावती,नागपूर, वर्धा या बसेस गेल्या पाच वर्षापूर्वी बंद झाल्या. शाळा बंद झाल्यानंतर उन्हाळ्यात लांब पल्ल्याच्या बसेस मानव विकास मिशनच्या बसेसच्या माध्यमातून चालवण्यात येतात. बसेस चा तुटवडा याला कारणीभूत आहे. लाल रंगाच्या तूर्तास पाच बसेस प्राप्त झाल्या. 20 वातानुकूलित शिवाई बसेस दाखल होणार आहेत. शिवायई दाखल झाल्यानंतरच अहेरी आगाराचा लांब पल्ल्याचा प्रवास सुरू होईल.
प्राप्त झालेल्या पाच बसमुळे अहिरे आजाराला थोडीफार संजीवनी मिळाली असली तरी आगारात नियोजनाचा अभाव सुद्धा दिसून येतो. बसेसची कमतरता आणि नियोजनाचा अभाव यामुळे अहेरी आगाराची दुरावस्था झाली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सेवेसाठी अहेरी आगार कसा मार्ग काढते ते भविष्यात दिसून येईल.

