भामरागड : दि. 11/05/2025 रोजी, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे जवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिरोली पोलिसांना प्राप्त झाली.
या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली नक्षलविरोधी अभियान पथकाच्या 200 जवानांचे विशेष अभियान काल संध्याकाळी राबवण्यात आले होते. आज दि. 12/05/2025 सकाळी सदर जंगल परिसरात शोध घेत असताना माओवादी संघटनांनी पोलिसांवर हल्ला चढवून अंदाधुंद गोळीबार केला. नक्षल विरोधी अभियान पथकाच्या जवानांनी त्वरित प्रत्युत्तर दिले. ही चकमक तीन वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास दोन तास चालू होती.
चकमकीनंतर परिसरात करण्यात आलेल्या शोध मोहीमेदरम्यान खालील प्रमाणे मोठ्या प्रमाणावर माओवाद्यांचा शस्त्रासाठा जप्त करण्यात आला.
एक स्वयंचलित इन्सास रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझीन, अनेक जिवंत काडतुसे, डिटोनेटर, एक रेडिओ, तीन पिट्टु (सामानाची पिशवी), वॉकीटॉकी चार्जर इ. मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आणि वैयक्तिक वस्तू मिळाल्या. सदर माओवादी तळ सी-60 जवानांनी पूर्णतः उद्ध्वस्त केला आहे. चकमकीत काही माओवादी जखमी अथवा ठार झाल्याची शक्यता असून त्यांना इतर माओवाद्यांनी जंगलात नेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या भागात अजूनही ऑपरेशन सुरु असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यासंबंधी अधिक तपशील लवकरच प्रसिद्ध केला जाईल.
