लक्ष्मण रत्नम शिक्षक
येल्ला, मुलचेरा
उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले
अजूनही अजूनही ।।धृ।।
चिमणी म्हटले की १९९७ साली प्रकाशित झालेल्या इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या वरील कवितेची आठवण होते.
जागतिक चिमणी दिवस दरवर्षी २० मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व, त्यांचे संरक्षण करण्याची गरज समजून घेणे आणि त्यांच्या घटत्या संख्येबाबत जागरूकता निर्माण करणे होय.
चिमणीचे महत्त्व –
चिमणी ही माणसाच्या खूप जवळची पक्षी प्रजाती आहे. ती मुख्यतः घराच्या छपरांवर, भिंतींच्या फटींमध्ये किंवा झाडांवर घरटे करून राहते. चिमण्या कीटक आणि किडे खाऊन शेतीस मदत करतात. तसेच त्या पर्यावरणाच्या अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका बजावतात.
चिमण्यांची घटती संख्या: एक गंभीर समस्या –
गेल्या काही दशकांमध्ये
चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. जिथे कधी मोठ्या संख्येने चिमण्या दिसायच्या, तिथे आज त्या दुर्मीळ झाल्या आहेत. या घटनेसाठी अनेक कारणे जबाबदार आहेत –
•शहरीकरण आणि अधिवास नष्ट होणे:–
मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या शहरांच्या विस्तारामुळे चिमण्यांना घरटी बांधण्यासाठी जागा मिळत नाही. जुन्या घरांमध्ये असणाऱ्या फटी, छप्पर आणि आडोसे यामध्ये त्या घरटे करत असत. मात्र, आधुनिक काँक्रीटच्या इमारतींमध्ये अशी जागा उरलेली नाही.
- मोबाईल टॉवर आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन:–
मोबाईल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे चिमण्यांच्या जीवनचक्रावर विपरीत परिणाम होत आहे. काही संशोधनांनुसार, या किरणोत्सर्गामुळे चिमण्यांचे दिशादर्शन क्षमतेवर परिणाम होतो आणि त्यांना योग्य प्रकारे स्थलांतर करणे कठीण होते.
•अन्नस्रोतांची कमतरता:–
शेतीमध्ये वाढता रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर चिमण्यांच्या अन्नसाखळीवर प्रभाव टाकतो. पूर्वी, शेतीतून भरपूर प्रमाणात किडे आणि धान्य सहज मिळायचे, पण आता ते घटत चालले आहे.
•पाणीटंचाई आणि हवामान बदल:–
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चिमण्यांना प्यायला पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच, हवामान बदलामुळे पावसाळ्यातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्यांच्यासाठी नैसर्गिक जलस्रोतही दुर्मिळ झाले आहेत.
•प्लास्टिक आणि प्रदूषणाचा धोका:–
चिमण्यांची घरटी तयार करताना अनेकदा प्लास्टिक आणि इतर कृत्रिम पदार्थ वापरले जातात, ज्यामुळे त्यांना धोका निर्माण होतो. तसेच, वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे त्यांच्या संप्रेषणावर परिणाम होतो.
चिमण्यांचे संरक्षण कसे करावे? –
चिमण्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येकाने काही उपाय करणे गरजेचे आहे –
•चिमण्यांसाठी पाणी आणि अन्न ठेवावे – उन्हाळ्यात अंगणात किंवा गच्चीवर मातीच्या भांड्यात पाणी ठेवावे. तसेच, त्यांच्यासाठी काही धान्य टाकावे.
•चिमण्यांसाठी घरटी उपलब्ध करून द्यावीत – बाजारात कृत्रिम घरटी सहज उपलब्ध असतात. तसेच, लाकडी पेटी किंवा फळ्यांचा वापर करून घरटे तयार करता येते.
•झाडे लावा – मोठ्या प्रमाणावर झाडे लावल्यास चिमण्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. विशेषतः फळझाडे लावल्यास त्यांना अन्न आणि आसरा मिळतो.
•कीटकनाशकांचा कमी वापर करावा – नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेतीला चालना दिल्यास चिमण्यांसाठी उपयुक्त असे अन्न टिकून राहील. मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गावर नियंत्रण आणावे – सरकार आणि वैज्ञानिक संस्थांनी मोबाईल टॉवरच्या किरणोत्सर्गाबाबत अधिक संशोधन करून उपाययोजना आखाव्यात.
जागतिक चिमणी दिवसाचे महत्त्व –
भारतात नेचर फॉरएव्हर सोसायटीचे संस्थापक मोहमद दिलावर यांनी २०१० मध्ये जागतिक चिमणी दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली. हा दिवस साजरा करून लोकांमध्ये चिमण्यांच्या संवर्धनाबद्दल जागरूकता वाढवली जाते. शाळा, महाविद्यालये, पर्यावरणप्रेमी संस्था विविध उपक्रम राबवतात, जसे की – चित्रकला स्पर्धा, वृक्षारोपण, चिमण्यांसाठी घरटी लावणे इत्यादी.
चिमण्या आपल्या पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपल्या लहानशा प्रयत्नांमुळे चिमण्यांची संख्या वाढू शकते आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाऊ शकतो. म्हणूनच, चला, चिमण्यांसाठी एक पाऊल पुढे टाकू!

