प्रतिनिधी
एटापल्ली : परिसरात असलेल्या तीनही वनविभागामध्ये सागवान लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. इतर लाकडाच्या तस्करीचा प्रकार अजून पर्यंत उघडकीस आला नाही. इतर लाकडांचे प्रमाण सुद्धा कमी आहे. गेल्या काही दशकात पहिल्यांदाच सेमल लाकडाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला. विविध उपयोगासाठी या लाकडाचा वापर होतो. झाडे तोडले. झाडे महाराष्ट्राच्या हद्दीतील आहेत. पण जाणार कुठे होती. हा एक मोठा प्रश्न आहे. याचा शोध वनविभागाला घ्यायचा आहे. वनविभागासमोर मोठे आव्हान आहे. वनविभागाच्या चर्चेनुसार तोडण्यात आलेली सेमल लाकडे छत्तीसगडच्या रायपूर येथे जाणार असल्याची शंका आहे.
मिहीर निमाई विश्वास याला एक दिवसाची वनकोठडी मिळाली. लाकडे कुठे जाणार होती, ते कोण खरेदी करणार होते याचा उलगडा कोठडीत केला जाण्याची शक्यता आहे. आरोपीने खरेदीदाराचा पत्ता दिला तर वनविभागाला सेमलच्या मुळापर्यंत जाणे सोयीचे होईल.
सेमलच्या उपयोगा संदर्भात तर्क-वितर्क लावण्यात येत आहेत. सेमल म्हणजे सावरीचे झाड. झाडाच्या खोडाला काटे असतात. लाकूड नरम असते. प्लायवूड तयार करण्यासाठी वापर होतो असे सांगण्यात येते. प्लायवूड तयार करण्यासाठी सेमल लाकडाचा वापर होत असला तरी आतापर्यंत प्लायवूड तयार करणाऱ्या कंपन्यांनी या लाकडासाठी आपला मोर्चा गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलाकडे वळविला नव्हता. मग हा मोर्चा अचानक कसा काय वळला हा मोठा प्रश्न आहे.
प्लायवूड निर्मिती सोबत या लाकडा पासून विविध प्रकारच्या औषधी सुद्धा तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. धार्मिकदृष्ट्या सुद्धा या लाकडाचे महत्त्व आहे. सेमल लाकडाची साल, पान, फुल, फळे,आणि मुळे औषधे तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरात येतात.
सेमलचे लाकूड बहुउपयोगी असल्याने छत्तीसगडच्या सक्रिय असलेल्या व्यवसायिकांनी गडचिरोलीला आपले लक्ष केले. छत्तीसगड राज्याला लागून असलेल्या वन परिसरात वन विभागाचा कर्मचारी फारसा सक्रिय नाही. मुख्यालयी राहतच नाही. अमावस्या-पौर्णिमेला दर्शन देतो. यामुळे येथून सहजपणे लाकूड ‘इस पार से उस पार’ करता येऊ शकते हे ओळखले. परप्रांतात सेमल लाकूड पाठवायला सुरुवात झाली. पण प्रयत्न फसला. ट्रक पकडला गेला.
पहिल्यांदाच सेमल लाकूड चर्चेत आले. सेमल लाकडाची आता सगळ्यांनाच ओळख झाली आहे. बहुपयोगी झाड आहे भविष्यात वन तस्करांची या झाडाकडे नजर राहण्याची शक्यता आहे या नजरेला थांबवण्यासाठी वन विभागाला सुद्धा करडी नजर ठेवावी लागणार आहे. सेमल लाकडे खरेदी करणारा तो कोण ? याचा शोध वनविभागाला घ्यावा लागणार आहे.

