अहेरी : विभागीय आयुक्ताच्या आदेशान्वये आज दिनांक 8 मार्च 2025 ला तातडीने शिक्षण परिषदेचे आयोजन करावयाचे होते. तसा तातडीचा आदेश काल येऊन धडकला. पंचायत समिती अहेरीच्या विविध केंद्रांमध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्था अहेरीची 16 मार्च 2025 ला निवडणूक होऊ घातली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आरपारची लढाई आहे. शिक्षण परिषदेचा वापर प्रचारासाठी करता येऊ शकतो हे पतसंस्थेच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांनी ओळखले. आज दिवसभर चाललेल्या शिक्षण परिषदेमध्ये प्रचाराची रणधुमाळी उडविली.
आज या प्रकाराची शिक्षक मंडळींमध्ये दिवसभर चर्चा होती. विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये समन्वय कसा असावा. शिक्षणाचा दर्जा उंचावा म्हणून काय उपाययोजना करता येतील यावर शिक्षण परिषदेमध्ये चर्चा होत असते. पण आज उमेदवारांनी शिक्षण परिषदेला प्रचाराचा अड्डा बनविल्याने याच विषयाची दिवसभर चर्चा होती.
अहेरी तालुक्यात एकण आठ केंद्र आहेत. तालुक्याच्या विविध शाळांतील शिक्षक या ठिकाणी एकत्रित आले. एकगठ्ठा शिक्षक किंवा मतदार येथे मिळू शकतात हे पतसंस्थेच्या उमेदवारांनी नेमके हेरले. पतसंस्थेचे उमेदवार आपल्या समर्थकांसह शिक्षक परिषदेमध्ये पोहोचले. डमी मतपत्रिका, दुपट्टे, पत्रके इत्यादी साहित्य हातातच होते. मतदार शिक्षक असल्याने व मित्रमंडळीतील असल्याने कुणीच या प्रकाराचा विरोध केला नाही. मनसोक्तपणे प्रचाराचे साहित्य वाटून प्रचार करण्यात आला.
काही शिक्षकांना मात्र हा प्रकार खटकला. शिक्षण परिषदेचा हेतू काय आणि आजची शिक्षण परिषद कोणत्या दिशेला गेली. याबाबत ते खंत व्यक्त करीत होते. प्रचार करायचाच होता तर अन्य दिवशी करायला पाहिजे होता. शाळेवरही जाता आले असते आणि घरी जाऊन पण प्रचार करता आला असता पण पतसंस्थेच्या राजकारणाचा रंग चढलेल्या शिक्षक उमेदवारांना मात्र मोह आवरता आला नाही.
पतसंस्थेची यावेळेसची निवडणूक साधी सोपी नाही. पतसंस्थेच्या निवडणुकीत फक्त दोन पॅनल आहे. हा नाहीतर तो. अशी परिस्थिती आहे. कोणतेतरी एक पॅनल आपली सत्ता स्थापन करेल. अशा परिस्थितीत कोणतीही जोखीम स्वीकारायची नाही. हे धोरण दोन्ही पॅनलने स्वीकारले आहे. यात शिक्षण परिषदा ‘बळीचा बकरा’ ठरत आहेत.
